Political: पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपा ‘एकला चलो रे’
पक्षश्रेष्ठींकडून संकेत; शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका : पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने रणनीती आखणार!

पिंपरी- चिंचवड : लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती. मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आमची भूमिका एकला चलो रे अशी असणार आहे याच्याबाबत यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी संकेत दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मी ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतो, त्या पक्षाचे महापालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याचा आमचा मानस असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप म्हणाले त्यांच्या या भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड मध्ये स्वबळावर सत्ता आणण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी सुरू केली आहे.त्या दृष्टीने भाजपच्या बैठका सुरू आहेत. स्थानिक पातळीवर चाचणी देखील सुरू झाल्याचे दिसत आहे. अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबतची रणनीती भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी एक प्रकारे बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची रणनीती आखली असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
आमदार जगताप यांनी गुरुवारी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले, महापालिकेच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहे.लोकसभा आणि विधानसभेपर्यंत महायुती होती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत पक्षश्रेष्ठीकडून मिळालेले आहेत.
आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार आहोत, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतो, त्या पक्षाचे महानगपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याचा आमचा मानस आहे.
भाजपाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नाना काटे उपस्थित…
सध्या शहरांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. ही बैठक भाजपाच्या माजी नगरसेवकांची होती मात्र बैठकीला राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित राहिल्यामुळे त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.