शांततापूर्ण मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
आचारसंहितेच्या काळात १६ लाख १७ हजार ४०० रुपयांची रोकड ताब्यात

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवारी मतदान व शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त व धडक कारवाया करण्यात आल्या. आचारसंहितेच्या काळात दैनंदिन तपासणीत १६ लाख १७ हजार ४०० रुपयांची रोकड ताब्यात घेतली.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४२० इमारतींमध्ये एकूण २,१३५ मतदान केंद्रे असून, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वंकष नियोजन केले आहे. निवडणूकपूर्व बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ३४ तपासणी पथके नियुक्त केली. यासह १,३०६ परवानाधारक शस्त्रे जमा केली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी १२ ठिकाणी रूट मार्च काढण्यात आले.
९६२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ९६२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये ५० उपद्रवी व्यक्तींना जिल्ह्याबाहेर पाठविले. ‘एमपीडीए’अंतर्गत सात सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध, तर ‘माेका’अंतर्गत नऊ टोळ्यांवर कारवाई करून ४७ गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली. याशिवाय ३७ गुन्हेगारांना हद्दपार, तर ४३८ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्थानिक क्षेत्राबाहेर जाण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – नवोदीत मतदारांसह शेकडो युवकांनी घेतली मतदानाची शपथ
अवैध धंदे, अमली पदार्थांवर कारवाई
अवैध मद्यविक्रीविरोधात २७६ छापे टाकून १० लाख ३६ हजार ९७२ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. एनडीपीएस कायद्यांतर्गत १८ छाप्यांत ६६ लाख १९ हजार ५३१ रुपयांचा गांजा, एमडी, अंमली पदार्थ जप्त केले.
अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम
आचारसंहिता कालावधीत नऊ अवैध पिस्तुले व २३ घातक शस्त्रे जप्त केले. १ नोव्हेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीतील विशेष मोहिमेत ९१ अवैध पिस्तुले व २२९ घातक शस्त्रे जप्त करून तीनशेहून अधिक गुन्हेगारांना अटक केली.
७६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ५७ छापे घातले. यात ७६ लाख नऊ हजार ७०१ रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाकाबंदी, गस्त, गुन्हेगार तपासणी व रूट मार्च करण्यात आले. असामाजिक घटकांवर ‘वाॅच’ आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड




