breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमआरडीएचा कारभार आता मराठीत

परवाने, निविदा प्रक्रियाही पार पडणार मातृभाषेतून , महानगर आयुक्त योगेश म्हसे यांचा आदेश

पिंपरी : राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये सामान्य नागरिकांशी केला जाणारा पत्रव्यवहार, सर्व नमुने, पत्रके, परवाने, टिपणी, आदेश, परिपत्रके, अहवाल आदी कार्यवृत्तांत मराठी भाषेत असणे आवश्‍यक आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने देखील प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजभाषा मराठीचा प्रशासन स्तरावर वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाने सर्व कार्यालये, महामंडळे यांना मराठीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यास अनुसरून पीएमआरडीएच्या कामकाजात राजभाषा मराठीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेशी होणारा पत्रव्यवहार, कार्यालयीन कामकाज मराठीत करावे. सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंदवह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, टिप्पण्या, नस्त्या व पत्रव्यवहार यावरील शेरे, अभिप्राय, परिपत्रके, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते तसेच संकेतस्थळे मराठीत असावीत.

हेही वाचा    –      ‘आठवलेंचा पक्ष हाच खरा आंबेडकरवादी पक्ष म्हणालो तर’; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर

प्राधिकरण कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर एखादी व्यक्ती किंवा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतूनच लिहावीत. पदनामाचा उल्लेखही मराठी भाषेत असावा. टिप्पणी, आदेश, परिपत्रके व इतर पत्रव्यवहार यावर रोमन लिपीत इंग्रजीमध्ये सह्या मराठीतच कराव्यात. निमंत्रणे मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रणपत्रिका असावी. प्राधिकरणाच्या जाहिराती व निविदा किमान दोन मराठी वृत्तपत्रातून प्रसिध्द कराव्यात.

मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिराती व निविदा मराठी भाषेत प्रसिध्द करणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील माहिती मराठी भाषेत असावी. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधिकरणाची माहिती सर्वांच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्यास संकेतस्थळावर ती केवळ इंग्रजी भाषेत न ठेवता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रसिध्द करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जनसामान्यांना उपलब्ध करून दिलेल्या माहिती अधिकार, आपले सरकार, ई-निविदा इत्यादी ऑनलाईन सेवा किंवा पोर्टल मराठी भाषेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी मराठीचा यथायोग्य वापर करावा. मराठी वापराबाबतच्या सूचनांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी केल्या आहेत.

प्राधिकरणातील सर्व व्यवहार आणि निविदा प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात. त्यामुळे प्रशासन विभागाला त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, प्रत्येक विभागाला तसे कळवण्याचे सूचना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button