ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील ‘विवेकी’ आणि ‘इमानदार’ नि:स्पृह पत्रकाराचा हृद्य सन्मान!

‘शब्दधन काव्यमंच’ चा ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’ उपक्रम

पिंपरी : सामाजिक, राजकीय भान ठेवून त्यावर नि:ष्पक्ष भाष्य करणारा पत्रकार हा कुठल्याही मोठ्या साहित्यिकांइतकाच उत्तम साहित्यिक असतो, असे मत तळेगाव येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या वतीने चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या अभिनव उपक्रमांतर्गत एमपीसी न्यूजचे संस्थापक- संचालक आणि शहरातले ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विवेक इनामदार यांचा त्यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून पं. परळीकर बोलत होते. त्यांच्यासोबत तळेगाव येथील उद्योजक अभिजित इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक दादासाहेब उऱ्हे, विवेक इनामदार यांची आई विजया इनामदार, वडील विजयकुमार इनामदार, पत्नी वैशाली इनामदार, भावजय सीमा इनामदार, पुतणी समीरा इनामदार हे सारे कुटुंब उपस्थित होते.

शहरातले ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक हे नेहमीच शब्दधनच्या अभिनव उपक्रमांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी केलेले प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या अभिनव उपक्रमांमुळे सर्वपरिचित होतात. याच उपक्रमांतर्गत विवेक इनामदार यांच्या घरी साहित्य सुसंवाद रंगला. अरुण बोऱ्हाडे, सुभाष चव्हाण, अशोकमहाराज गोरे, तानाजी एकोंडे, विवेक कुलकर्णी, फुलवती जगताप, अमरदीप मखामले, हेमंत कंक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

साध्या पण अतिशय भावनिक किनार असलेल्या या कार्यक्रमात विवेक इनामदार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकमाच्या सुरुवातीला तानाजी एकोंडे यांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा अभंग सादर केला; तर सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर करताना या उपक्रमाबद्दलची माहिती प्रभावी शब्दात मांडली. कवी, पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी विवेक इनामदार यांचा परिचय करून दिला.

प्रमुख पाहुणे पं. किरण परळीकर म्हणाले, “सामाजिक, राजकीय भान ठेवून त्यावर नि:ष्पक्ष भाष्य करणारा पत्रकार हा कुठल्याही मोठ्या साहित्यिकांइतकाच उत्तम साहित्यिक असतो. विवेक इनामदार यांनी कायम सत्यतेची पत्रकारिता केली आहे. जगात माणसे खूप चांगली कामे करतात, त्यांचे सत्कर्म लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विवेक इनामदार यांनी कायम केले. नि:स्वार्थ पत्रकारिता जपण्याचे काम केले आहे. बदलत्या जगाकडे सजग दृष्टीने पाहून एमपीसी न्यूज पोर्टलची निर्मिती केली. ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’च्या माध्यमातून अनेक कवी, लेखकांना लिहिते केले.”

दादासाहेब उऱ्हे म्हणाले, “नि:ष्पक्ष पत्रकारिता, प्रामाणिकपणा, सचोटी, समाजमनावर प्रेम विवेक इनामदार यांच्या लेखणीतून वाचकांनी अनुभवले आहे.” ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते अरुण बोऱ्हाडे म्हणाले, “पत्रकारितेबरोबर विवेक इनामदार यांनी लेखक आणि कामगार कवी त्याचबरोबर सामाजिक संस्था, साहित्य संस्था यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.” बहारदार सूत्रसंचालन कवी तानाजी एकोंडे यांनी केले; तर आभार श्यामराव सरकाळे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button