पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी स्वतः वेशांतर करून खंडणीखोराला केले जेरबंद
![Pimpri-Chinchwad Police Commissioner disguised himself and arrested the ransom seeker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220327-WA0001.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून मोठी कारवाई केली आहे. त्यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात रोषल बागल नावाने वावरणारा हा तरुण स्वतःला कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली होती. त्यावरून कृष्ण प्रकाश यांनी स्वतः तातडीने त्याला जेरबंद करण्याचे ठरविले होते.
त्यानुसार वेष बदलून आयुक्त कृष्ण प्रकाश स्वतः आरोपीसमोर बसले. आपण काम करवून घेण्यासाठी आलो असल्याचे भासवत त्यांनी आरोपीला रोख रक्कमही दिली. मात्र आरोपीने पैसे स्वीकारताच कृष्ण प्रकाश आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी आरोपी रोषलला रंगेहाथ पकडून जेरबंद केले. या घटनेबाबत कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, जमीन खरेदीप्रकरणी पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीर काम करून घेण्याचे सांगत आरोपीने दोन लाखांची रक्कम मागितली होती. मात्र समोर पोलीस आयुक्तच बसलेत हे त्याला ओळखता आले नाही. आरोपीने माझ्याकडून पैसे घेताच मी माझी ओळख सांगितली आणि त्याचे धाबे दणाणले. आरोपी रोषलच्या अटकेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीररित्या काम करवून घेणार असल्याचे सांगत एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आलेला रोषल पोलीस आयुक्तांच्याच जाळ्यात अलगद अडकला. आधीही त्याने आपल्या घर मालकाला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळल्याची माहिती तपासात समोर आली. त्याशिवाय रोषलकडे पोलिसाचे बनावट ओळखपत्रही पोलिसांना मिळाले. आरोपी रोषलने एका व्यक्तीला अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले असल्याचे चित्रीकरणही पोलिसांनी जप्त केले. त्याआधारे पिंपरी-चिंचवड पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. या कारवाईत स्वतः पोलीस कृष्ण प्रकाश, शस्त्रविरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र निकाळजे आणि गुंडविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने तसेच इतर कर्मचारी सामील होते.