पिंपरी-चिंचवड महापालिका सलग तिसऱ्या वर्षी ई-गव्हर्नन्समध्ये आव्वल
पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच प्रशासनाचे यश
![Pimpri-Chinchwad Municipality topped e-Governance for the third year in a row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/pcmc-2-780x470.jpg)
पिंपरी: महापालिकेने नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या मदतीने नागरिकांना जलद व सुलभ पद्धतीने जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर दिला आहे. महापालिकेस ई-गव्हर्नन्स निर्देशांकात मिळालेले अव्वल नामांकन त्याचाच पुरावा आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल घडविण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना मिळालेली ही कौतुकाची थाप नक्कीच महापालिकेच्या कामकाजात आधिकाधिक सुधारणा करण्यासाठी आणखी प्रोत्साहन देईल असे प्रतिपादन करत महापालिकेच्या या यशात, शहारातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांचा सगळ्यात मोठा वाटा असून त्यांनी ई-प्रशासनाला दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे हे यश मिळाले असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
धोरण संशोधन संस्थेने नुकताच राज्यातील २७ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर झाला. या निर्देशांकात सलग तिसऱ्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. नागरिकांना सोप्या पद्धतीने सरकारी सेवा उपलब्ध व्हाव्यात, व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी आणि आवश्यक सुविधा आणि माहिती नागरिकांना सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी हा ई-गव्हर्नन्सचा उद्देश आहे.
धोरण संशोधन संस्थेने शहरी भागातील लोकसंख्या विचारात घेऊन राज्यातील विविध शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांची ई-गव्हर्नन्सची सद्यपरिस्थिती पडताळली. ही पडताळणी करताना महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मिळणाऱ्या ऑनलाईन सुविधा, महापालिकेच्या कामात असणारी ऑनलाईन पारदर्शकता तसेच महापालिकेचे संकेतस्थळ, मोबाईल ऍप, सोशल मिडीया हॅन्डल्स अशा सर्व बाबींचा विचार करण्यात आला होता. या सर्व निर्देशांकाच्या निकषांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रथम तीन शहरांमध्ये पिंपरी चिंचवड (१० पैकी ७.१८ गुण), मुंबई (१० पैकी ६.८० गुण) आणि कोल्हापूर (१० पैकी ६.७० गुण) या तीन शहरांचा समावेश आहे. उपलब्धता या निकषामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या शहरांमध्ये पुणे आणि कोल्हापूर (१० पैकी ७.१४ गुण), पिंपरी चिंचवड आणि मुंबई (१० पैकी ६.६७ गुण), कल्याण डोंबिवली (१० पैकी ५.२४ गुण) या शहरांचा समावेश आहे. तर पारदर्शकता या निकषामध्येही पिंपरी चिंचवड (१० पैकी ७.७१) शहराने अव्वल मानांकन मिळवले असून पिंपरी चिंचवडच्या खालोखाल मुंबई आणि कोल्हापूर (१० पैकी ७.१४ गुण) तसेच पुणे (१० पैकी ६. ५७) अशा गुणांसह निकाल जाहीर झाला आहे.
सेवा निकषामध्ये प्रथम तीन शहरांमध्ये पिंपरी चिंचवड (१० पैकी ७.०२), मुंबई (१० पैकी ६.६०), पुणे आणि कोल्हापूर (१० पैकी ६.७०) शहराचा समावेश आहे. तर संकेतस्थळ माध्यमाबाबत उत्तम कामगिरी केलेल्या प्रथम तीन शहरांमध्ये पिंपरी चिंचवड (१० पैकी ८.८९), मुंबई (१० पैकी ८.५२) आणि अमरावती (१० पैकी ७.७८) या शहरांचा समावेश आहे. मोबाईल ऍपमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या तीन शहरांमध्ये पुणे आणि कोल्हापूर (१० पैकी ५.४३), पिंपरी चिंचवड (१० पैकी ५.२२) तसेच मुंबई (१० पैकी ४.५७) शहराचा समावेश आहे.