पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग साकारणार हरीत मतदान केंद्र उपक्रम
![Pimpri Chinchwad Municipal Corporation's Parks Department will implement green polling station initiative](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पुणे | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मतदारांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी हरीत मतदान केंद्र उपक्रम राबविला आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या अधिपत्याखाली पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एनसीआरडी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित चार हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली आहेत.
हेही वाचा – मतदानाला अवघे काही तास बाकी असताना पुण्यात रात्रीच्या वेळी राजकारण तापलं
या उपक्रमामध्ये नक्षत्र वाटिका, १४२ आयुर्वेदिक वनस्पती, देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप, मतदारांना प्रोत्साहनपूरक रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच २०२४-२५ आर्थिक वर्षात हरीतदूत स्वयंसेवक फळी निर्माण करून वृक्षारोपण कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त श्री. घोडके यांनी दिली आहे.हरित मतदान केंद्र उपक्रमात उद्यान अधिकारी प्रणव ढवळे आणि त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, माळी प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले आहे.