पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोरोना वॉररूम’ची जबाबदारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे..!
![Pimpri Chinchwad Municipal Corporation's 'Corona Warroom' is the responsibility of Dr. To Anil Roy ..!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/anil-roy.jpeg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, विविध घटकांशी समन्वय साधण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच वॉर रुमची जबाबदारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे दिली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला 1400 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अलर्ट होत, पूर्वीची सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अधिकाऱ्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. महापालिकेच्या आदेशाची प्रभाविरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
वाचा :-नगरसेवक रवि लांडगे यांच्या फ्लेक्सबाजीमुळे माजी आमदार विलास लांडे झाकोळले!
सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे जंबो हॉस्पिटल, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांच्याकडे घरकुल कोविड केअर सेंटर, नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे ऑटो क्लस्टर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, मकरंद निकम यांच्याकडे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण ‘क’, उपायुक्त अजय चारठणकर यांच्याकडे ‘ड’, संदीप खोत ‘फ’, चंद्रकांत इंदलकर ‘इ’, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख ‘ग’ आणि अण्णा बोदडे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे.
या अधिकाऱ्यांनी विभागाच्या कामकाजाव्यतिरिक्त नेमून दिलेले अतिरिक्त काम करावे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा, औषधे, जेवण, वीज, पाणीपुरवठा किंवा इतर कोणत्याही रुग्णविषयक तक्रारी, अडचणी बाबत वैयक्तिक पाहणी करावी. संबंधित अधिकारी, विभाग यांच्याशी समन्वय साधून दररोज संध्याकाळी आयुक्तांना अहवाल द्यावा. क्षेत्रीय कार्यालयातील हॉस्पिटल, संस्थेला भेट देवून लसीकरण कामकाजातील त्रुटी दूर कराव्यात.
आयुक्त कार्यालयातील वॉर रुमची जबाबदारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे देण्यात आली आहे.
रॉय यांनी समन्वय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून विविध हॉस्पिटल मधील बेड व्यवस्थापन, औषध विषयक पुरवठा, लसीकरण केंद्रावरील अडचणी, इतर सरकारी कार्यालये, संस्था यांच्याशी समन्वय साधावा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना दैनंदिन अहवाल सादर करावा, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.