breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक रवि लांडगे यांच्या फ्लेक्सबाजीमुळे माजी आमदार विलास लांडे झाकोळले!

  • राष्ट्रवादीतील महत्त्वाकांक्षी लोकांची अस्वस्थता वाढली
  • लांडेंसह शिंदे, गव्हाणे, भालेकरांसाठी धोक्याची घंटा

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपाला धक्का देत नाराज नगरसेवक रवि लांडगे यांनी शहरात ‘आमचं चुकलं का?’ अशी फ्लेक्सबाजी करीत राजकीय रान पेटवले.  आगामी काळात रवि लांडगे हेच भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे प्रतिस्पर्धी होणार, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, यामुळे राष्ट्रवादीतील महत्त्वाकांक्षी लोकांची अस्वस्थता वाढली आहे.

महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये प्रभाग ६ चक्रपाणी वसाहत, धावडे वस्ती येथून रवि लांडगे यांना भाजपाच्या तिकीटावर बिनविरोध निवडून आणण्यात आमदार लांडगे, माजी आमदार लांडे यांनी पुढाकार घेतला. वास्तविक, योगेश लांडगे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी आमदार लांडगे यांनी यशस्वी शिष्टाई केली होती.

मात्र, महापालिकेतील पदवाटपात महत्त्वाच्या पदावर संधी देण्यात आमदार लांडगे यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आक्षेप घेत रवि लांडगे यांनी आमदार लांडगे यांच्यासह भाजपाविरोधात बंड पुकारले. त्याची परिणिती फ्लेक्सबाजीत (माझं चुकलं का?) झाली. त्यामुळे राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे.

वास्तविक, आमदार लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी आपआपल्या परीने आमदार महेश लांडगे यांचा राजकीय विरोध केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार लांडे, नगरसेवक गव्हाणे, माजी नगरसेवक शिंदे यांना राष्ट्रवादीकडून तिकीटाची ‘ऑफर’ करण्यात आली होती. मात्र, मोदी लाटेचा विचार करुन तिघांनीही उमेदवारी नाकारली. त्याच निवडणुकीत लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. लांडे यांना राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबाही दिला होता.

महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे लांडे राजकीयदृष्ट्या विजनवासात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लांडे कमालीचे सक्रिय झाले आहेत. आमदार लांडगे यांना खुला विरोध करणारे एकमेव लांडेच आहेत, असे चित्र होते. पण, सफारी पार्कच्या मुद्यावरुन नगरसेवक पंकज भालेकर, शहराध्यक्ष पदाच्या मुद्यावरुन नगरसेवक अजित गव्हाणे आणि फ्लेक्सबाजीवरुन नगरसेवक रवि लांडगे यांनी आमदार लांडगेविरोधात दंड थोपाटले आहेत.  आता आमदार लांडगेचा प्रतिस्पर्धी कोण? याची स्पर्धा वाढली असून, रवि लांडगे यांच्या अचानक ‘एन्ट्री’मुळे माजी आमदार विलास लांडे तर झाकोळलेच दुसरीकडे राष्ट्रवादीतील या महत्त्वाकांक्षी इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.

आमदार लांडगेविरोधी चेहरा कोण?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (२०२२) आमदार महेश लांडगे यांचा विरोधी चेहरा कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिका निवडणुकीत ज्याला लांडगेंविरोधात सर्वाधिक नगरसेवक निवडून आणता येतील त्यालाच विधानसभा तिकीटाची ‘लॉटरी’ लागणार आहे. त्यामुळे लांडे, लांडगे, गव्हाणे, शिंदे, भालेकर आदी आमदार लांडगेविरोधी ‘खेळाडूंना’ आपले कसब महापालिका निवडणुकीतच दाखवावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button