पिंपरी – चिंचवड भाजपा अस्ताकडे झुकली – संजोग वाघेरे पाटील
![Pimpri - Chinchwad BJP leaned towards Asta - Sanjog Waghere Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/sanjog-waghere1.jpg)
पिंपरी चिंचवड | नुकत्याच झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या नियोजन समितीच्या निवडणुकीतही सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना चांगली मते मिळाली. हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून भारतीय जनता पक्ष नेस्तनाबूत होण्याची ही नांदी आहे, भाजपा आता अस्ताकडे झुकली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 जागांसाठी 10 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 95 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैशाली घोडेकर, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे हे तीन सदस्य विजयी झाले आहेत.
या निकालानंतर सत्ताधारी भाजपवर टिका करताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला 13 मतांचा कोटा असताना सहा सदस्यांना कोट्यापेक्षा आठ मते कमी पडली. सत्तेच्या जोरावर भाजपने चुकीचे निर्णय घेऊन ते लादले आहेत. सत्तेच्या मस्तीमुळे भाजप आणि भाजपचे नेते, कारभा-यांनी कोणत्याही निर्णयाचे आत्मपरिक्षण केले नाही. परिणामी, सत्ताधारी भाजपच्या या कारभाराला पक्षातील अनेक नगरसेवक वैतागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेवश करण्यासाठी भाजपचे असंख्य नगरसेवक इच्छूक आहेत. हे या निवडणुकीमुळे स्पष्ट झाले आहेत. भाजपमध्ये पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणा-यांचा भ्रमाचा भोपळा फुटला असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेस्तनाबूत होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल आणि शहराला विकासाची दिशा मिळेल, असेही संजोग वाघेरे पाटील म्हणाले.