breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू!

सर्व जप्त मालमत्तांचे लिलाव होणार : गत वर्षीच्या वसुलीचा टप्पा ओलांडला

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची यादी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली आहे. सील केलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कर संकलन विभागाने गतवर्षीच्या उत्पन्नाचा आताच टप्पा ओलांडला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्वेक्षणातही नोंदणी नसलेल्या मालमत्ताही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. गतवर्षी कर संकलन विभागाने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ८१४ कोटी रुपयांचा कर जमा करून घेण्यात यश मिळविले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत तब्बल ८१८ कोटीचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. असे असले तरी १ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीमचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.

१ लाखाच्या वर मालमत्ता धारकांकडे तब्बल ६८२ कोटी कर थकीत

कर संकलन विभागाच्या वतीने यंदा मालमत्ता जप्ती, सील आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा धडाका लावला आहे. असे असले तरी शहरात १ लाखाच्या वर मालमत्ता धारकांकडे तब्बल ६८२ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी विभागाने आता लिलावासारखी कठोर कारवाई सुरू केली आहे.

थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध होताच कर भरणा वाढला

शहरात १ लाख ४३२६ मालमत्ता धारकांचा थकीत कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने ५० हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध होताच धाबे दणाणलेले थकबाकीदार कर भरण्यास प्राधान्य देत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

३२ हजार १४० अधिपत्रे जारी

थकबाकी असलेल्या ३२ हजार १४० जणांना जप्ती संदर्भात अधिपत्रे काढण्यात आली आहे. ७ हजार ३११ अधिपत्रांची अमंलबजावणी करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार ५२ जणांनी ६८ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

दीड हजार मालमत्तांना जप्ती अधिपत्र डकविले

थकबाकी असलेल्या १ हजार ४९१ मालमत्ता धारकांना तुमची मालमत्ता जप्त केल्याबाबत अधिपत्र डकविले (चिकटविले) आहे. तर प्रत्यक्षात १८४ मालमत्ता सील केल्या असून ५८४ मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.

२२ दिवसांत १८२ कोटीचा महसूल गोळा करण्याचे आव्हान

महापालिकेचा महत्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून कर संकलन विभागाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या विभागातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या विभागाला चालू आर्थिक वर्षात १ हजार कोटींचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत ८१७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित २२ दिवसांत १८३ कोटी रुपयांचा कर जमा करून घेण्याचे कर संकलन विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे.

महापालिकेत जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तेरा मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने जप्त केलेल्या व अद्यापि थकीत कर न भरलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण संख्या पाहता ही प्रक्रिया वर्षभर राबविण्यात येईल. मालमत्ता विक्रीची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला थकीत कर तत्काळ भरून पालिकेस सहकार्य करावे.

 – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

थकीत 682 कोटी मालमत्ता करापैकी निवासी मलमत्तांकडे 500 कोटीपेक्षा अधिक कर थकीत आहे. त्यामुळे वसुलीच्या या अंतिम टप्प्यात निवासी मालमत्तांची जप्ती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पैसे भरण्याची क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली जात आहे.

   – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button