पिंपरी चिंचवड आपचे सामाजिक न्याय विंगचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावर हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/crime-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टीचे सामाजिक न्याय विंगचे अध्यक्ष यशवंत श्रीमंत कांबळे (वय 43, रा. संगमनगर, सांगवी) यांच्यावर तीन हल्लेखोरांनी फुगेवाडी येथे प्राणघातक हल्ला केला. शस्त्राने वार केल्याने कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचाय्वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या कालावधीत फुगेवाडी येथे घडली.
यशवंत कांबळे यांच्या फिर्यादीवरून आकाश गंगाधर मिसाळ, आदित्य संजय परदेशी, अनिकेत राजेंद्र तुपे (तिघे रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विमान नगर येथील खाजगी कंपनीत नोकरी करतात. तसेच ते पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत. शनिवारी सकाळी ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. फिर्यादी त्या आंदोलनासाठी गेले. आंदोलन झाल्यानंतर ते सांगवी येथील घरी दुचाकीवारुने कटे जात होते. दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास फुगेवाडी येथील मीनाताई ठाकरे मनपा शाळेच्या पुढे असलेल्या बोगद्याजवळ गेले असता दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी फिर्यादी यांच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
सध्या फिर्यादी यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला राजकीय हेतूने झाला आहे का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी फिर्यादीत केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.