Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: स्वीकृत नगरसेवक इच्छुकांसाठी २ तारखेला अर्ज दाखल करण्याची मुदत!

महापालिका आयुक्तांच्या सूचना : भाजपा, राष्ट्रवादीतून एकूण 10 सदस्यांना मिळणार संधी

पिंपरी-चिंचवड । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षाच्या संख्याबळानुसार नामनिर्देशन पत्र सोमवारी (२ मार्च) दाखल करावेत, अशी सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटनेत्यांना केली. या अर्जांची छाननी केल्यावर पात्र अर्ज स्वीकारून स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव १३ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर आयुक्त मान्यतेसाठी ठेवणार आहेत. याच सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कायदा सल्लागार राजेश आगळे, नगरसचिव मुकेश कोळप, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे या बैठकीला उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. दहा स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.

नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक होणार आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडीचे नियम, अटी-शर्ती याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी गटनेत्यांना दिली. निकष प्राप्त असलेल्या व्यक्तींच्या नावांचे स्वीकृत नगरसेवकपदासाठीचे नामनिर्देशन पत्र २ मार्च रोजी दाखल करावे, अशी सूचना आयुक्तांनी गटनेत्यांना केली. त्यानुसार २ मार्च रोजी स्वीकृत नगरसेवकांचे नामनिर्देशनपत्र गटनेते आयुक्तांना सादर करणार आहेत. दरम्यान, सामाजिक क्षेत्रातील सहा जणांनी स्वीकृत नगरसेवकपद मिळावे, यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज गटनेत्यांकडे दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निकषांची माहिती गटनेत्यांना दिली आहे. गटनेत्यांकडून शिफारशीसह स्वीकृत नगरसेवकपदासाठीचे नामनिर्देशन पत्र दोन मार्च रोजी आयुक्तांकडे दाखल केले जातील. स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव १३ मार्च होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर गटनेत्यांची गुरुवारी बैठक झाली. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीचे निकष गटनेत्यांना सांगितले. त्यानुसार निकष प्राप्त असलेल्या व्यक्तींच्या नावांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याची शिफारस गटनेते आयुक्तांकडे करतील. गटनेत्यांकडून आलेल्या अर्जांची छाननी करुन आयुक्त पात्र व्यक्तीची पक्षाच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वसाधारण सभेकडे करतील. सर्वसाधारण सभा यावर अंतिम निर्णय घेईल. आयुक्तांची शिफारस सर्वसाधारण सभेने अमान्य केल्यास त्याची कारणे द्यावी लागणार आहेत.

कोण होऊ शकते स्वीकृत नगरसेवक?

स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासन, कायदा, वैद्यकीय, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक,  शिक्षण, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करणे अपेक्षित असते. मात्र, राजकीय पक्षांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच सामाजिक कार्य दाखवून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाते. स्वीकृत नगरसेवकाला भत्ते, महापालिका सभेत मुद्दे मांडण्याचे अधिकार असतात. केवळ मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button