‘झेंडा उंचा रहे हमारा’ कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा जागर..!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात
पिंपरी-चिंचवड : आकाशात दिमाखात फडकणारा तिरंगा, सभोवताली देशभक्तीच्या घोषणांनी आणि सुरांनी भारलेले वातावरण, आणि ‘ऐ वतन, वतन मेरे आज़ाद रहे तू’, ‘दिल दिया है, जान भी देंगे ये वतन तेरे लिये’, ‘आय लव्ह माय इंडिया’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘वंदे मातरम्’ यांसारख्या देशप्रेम जागवणाऱ्या गीतांची सुरेल मेजवानी असा देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रभावी आविष्कार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयोजित ‘झेंडा उंचा रहे हमारा’ या विशेष कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. (झेंडा उंचा रहे हमारा)
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयोजित देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रम अनुभवण्यासाठी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात “दिल दिया है जान भी देंगे”, “जय जय महाराष्ट्र माझा”, “शूर आम्ही सरदार,आम्हाला काय कुणाची भीती”, “संदेसे आते हैं”, “मेरा रंगदे बसंती चोला”, “वंदे मातरम”, “मेरे देश की धरती”, “ऐ वतन ऐ वतन”, यांसारखी अनेक लोकप्रिय हिंदी व मराठी भाषेतील देशभक्तीपर गीतांद्वारे देशप्रेमाचे सुंदर वातावरण तयार झाले होते.
या कार्यक्रमावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्व विशद केले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२६ संदर्भात माहिती देताना पिंपरी चिंचवड शहराने राज्यात मिळवलेला पहिला क्रमांक कायम राखत शहरवासियांनी या उपक्रमात सहभागी होऊन देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे, असे आवाहन केले. तर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले. तसेच राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राबविण्यात येतो, याबाबत माहिती देताना मराठी भाषेचा दैनंदिन वापर वाढवणे, तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठीया यांनी केले होते. तर गफार मोमीन, आशिष देशमुख, प्रग्या गौरकर, अमित दीक्षित, प्रकाश सोळंकी, किरण अंदुरे यांनी देशभक्तीची गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्वराज म्युझिक बँडच्या ९ प्रतिभावान वादकांनी त्यांना उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.




