बांधकामाच्या ठिकाणी कंपनीची भिंत अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू
भोसरी एमआयडीसीतील घटना

पिंपरी चिंचवड : कंपनीतील बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने लेवलचे काम सुरू असताना हादऱ्याने शेजारील कंपनीची सुमारे २५ फूट उंच भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मजुराचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये मॉडल मेटल वर्क या कंपनीत सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.
मारुती राघोजी भालेराव (वय ३२, रा. रानुबाई मळा, चाकण) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के. एस. पठारे यांनी याबाबत माहिती दिली. भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये मॉडर्न मेटल वर्क ही कंपनी आहे. कंपनीत सध्या काही बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले होते.
हेही वाचा – एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, थेट माजी नगराध्यक्षाला दिला पक्षात प्रवेश, शिवसेनेची ताकद वाढली
शनिवारी सायंकाळी मजूर भालेराव आणि एक जेसीबी चालक यांच्याकडून बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने लेवलचे काम सुरू होते. काम सुरू असताना हादऱ्यामुळे अचानक शेजारी असणाऱ्या दर्शन स्टील या कंपनीची सुमारे २५ फूट उंच सीमा भिंत आणि शेड मजूर भालेराव यांच्या अंगावर कोसळले. यात भिंतीच्या राडारोडयाखाली सापडल्याने भालेराव हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच जेसीबी चालकाने आरडाओरडा केला. या घटनेबाबत तातडीने महापालिका अग्निशामक दलाला कळविण्यात आले. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. गंभीर जखमी अवस्थेतील भालेराव यांना त्वरित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“या घटनेबाबत सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल.”
-के. एस. पठारे,सहायक पोलीस निरीक्षक – एमआयडीसी भोसरी





