पिंपरी चिंचवड महापालिकेत पार्थ पवार यांची ‘सरप्राईज व्हिजिट’, आयुक्तांसोबत बैठकीचे कारण मात्र ‘गुलदस्त्यात’!
पिंपरी– उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची आज (दि.०८) अचानक भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचा एकही स्थानिक पदाधिकारी उपस्थित नव्हता. दरम्यान पार्थ पवार यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी आयुक्तांची भेट घेतली? कोणत्या विषयांवर चर्चा केली? याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
पार्थ पवार यांनी आपल्या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळली. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेताच पार्थ पवार महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.दरम्यान, पार्थ पवार यांनी गेल्या वर्षी कोरोना काळात माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या घरी अचानक भेट दिली होती. तसेच तात्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेेत १२ जुलै रोजी वॉर रूमलाही भेट दिली होती. शहरात पार्थ पवार फाउंडेशन यांच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य वितरण, रक्तदान शिबीर आदी उपक्रम राबविले. मात्र, नेहमी प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहत आजही पार्थ पवार यांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांचा लावजमा न घेता व कार्यकर्त्याची गर्दी होवू नये म्हणून स्वतः आयुक्तांच्या दालनात जावून भेट घेतली असल्याचे स्थानिक पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.