मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पालखी सोहळा उत्साहात
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांच्या विठ्ठलभक्तीत न्हालं संपूर्ण शाळा प्रांगण

पिंपरी-चिंचवड | मास्टरमाइंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (एम.एम.जी.एस.) येथे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल-नामाच्या गजराने दुमदुमून गेला. लहानग्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेतून ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या भक्तिपंथाची अनुभूती देत, टाळ-मृदंगाच्या गजरात रिंगण सोहळा साजरा केला.
पालखीचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर आणि शिक्षकांच्या हस्ते पार पडले. यानंतर विद्यार्थ्यांची ‘दिंडी’ निघाली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, वासुदेव, विठ्ठल-रखुमाई यांच्या वेशातील बालवारकरी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, पताका आणि मुखी हरिनाम घेत पालखी भोवती फेर धरला. फुगड्या, अभंगगायन, श्लोक, नृत्य यांच्यातून वातावरण संपूर्ण भक्तिमय झाले.
नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले. या निमित्ताने विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते – संतांची वेशभूषा, विठ्ठल-रखुमाई प्रतिकृती तयार करणे, पालखी सजावट, अभंग व श्लोकगायन, संगीत इत्यादींमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारक ‘ट्रॅफिक’ समस्येने वैतागले!
अविस्मरणीय व नयनरम्य…
विद्यार्थ्यांनी पारंपरिक पांढऱ्या झब्बा-टोपी, नऊवारी साड्यांमध्ये आणि टाळ-तुळशीसह साकारलेली भक्तीमय भूमिका पाहून उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
“शाळा शिकताना तहान भूक हरली” या अभंगाच्या ओळी जणू साकार झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी पसायदान म्हटले गेले आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण शाळा भक्तीरसात न्हालेली पाहायला मिळाली. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येत एक अविस्मरणीय आणि नयनरम्य पालखी सोहळा अनुभवला.