महिलेच्या विनयभंग प्रकरणी ओझर्डे गावच्या सरपंचाच्या मुलावर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/molestation-1483757211-696x447.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेचे अश्लील फोटो काढून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारला असता पतीला शिवीगाळ करून मारण्यासाठी आरोपी अंगावर धावून आला. याप्रकरणी मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्या सरपंचाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 जुलै 2021 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाजूला एका हॉटेल समोर घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी 5 मार्च रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम किसन बावकर, ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका हॉटेलसमोर फिर्यादी महिला त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला केळी खाऊ घालत होत्या. त्यावेळी आरोपी कार (एम एच 14 / सी सी 6275) मधून आले. फिर्यादी खाली वाकून मुलीला केळी खाऊ घालत असताना एकाने फिर्यादी यांचे अश्लील फोटो काढले.
हा प्रकार लक्षात आल्याने फिर्यादी यांच्या पतीने याबाबत आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ व दमदाटी केली. ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांचा मुलगा हातात पेव्हिंग ब्लॉक घेऊन फिर्यादी यांच्या पतीच्या अंगावर धावून आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.