चिंचवड येथे दहशत पसरवणा-या टोळक्यावर दोन गुन्हे दाखल : पाच जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-10.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरासमोर धावत आलेल्या मित्राची विचारपूस करत असलेल्या तरुणाला मारहाण करून कोयत्याने वार केले. त्यानंतर तरुणाच्या बायकोला खाली पाडून जीवे मारण्याची व बलात्कार करण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री बारा वाजता रामनगर चिंचवड येथे घडली.
नीरज पवार, सुरज मोहिते, ऋषिकेश मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते, सुरज जाधव उर्फ कलब्या (सर्व रा. रामनगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रवीण अशोक जाधव (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराच्या बाहेर उभे असताना त्यांचा मित्र ज्ञानेश्वर हा धावत आला. त्याचे कपडे फाटलेले दिसल्याने फिर्यादी यांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी दहशत निर्माण करून फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांच्या बायकोला खाली पाडले. तिला सिमेंटच्या ब्लॉकने मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याने आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले. आरोपी सुरज जाधव याने फिर्यादी यांच्या पत्नीला ‘तू परत मला इकडे दिसलीस तर तुला खल्लास करून टाकीन. नाहीतर तुझा बलात्कार करीन’ अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे तपास करीत आहेत.
याच आरोपींवर आणखी एक गुन्हा दाखल
आरोपी नीरज पवार, कृष्णा देवकर, सुरज जाधव, सुरज मोहिते, ऋषीकेश मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते यांनी ज्ञानेश्वर रामदास हराळ (वय 32, रा. रामनगर, चिंचवड), त्यांचा मेव्हणा आप्पासाहेब गंगाधर काळे आणि ज्ञानेश्वर यांच्या पत्नीला विनाकारण मारहाण केली. ज्ञानेश्वर यांच्या पाठीत उसाने मारून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सैरावैरा पळत घरात जाऊन दरवाजे बंद करून घेतले. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 324, 323, 143, 144, 147, 148, 149, 504, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा 1932 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे तपास करीत आहेत.