पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी अनुभवला ‘क्रांतीचा संगीतमय जागर’

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व’चा दुसरा दिवस उत्साह, प्रेरणा आणि सांस्कृतिक वैभवाने भरलेला ठरला. क्रांती, समता आणि ज्ञान या तिन्ही मूल्यांचा सुरेल संगम अनुभवताना, प्रेक्षकांना एका जीवंत चळवळीचा भाग झाल्याचे समाधान मिळाले. गझल, भीमगीते, शाहिरी पोवाडे, सुगम संगीत आणि तबला-ढोलकीच्या जुगलबंदीने सभागृह भारावून गेले होते.
प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात परिवर्तन कला महासंघाच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार गुंडूराज कांबळे, प्रशांत मागाडे, आकाश भालेराव, निहाल लगाडे, अर्जुन नेटके, राहुल भिमटे, मनिषा म्हस्के, गौतम कांबळे, नवनाथ म्हस्के, भिवाजी कांबळे आणि रोहिदास भडकवाड यांनी सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या प्रबोधनपर गीतांनी महापुरुषांच्या कार्याचा जागर करत उपस्थित प्रेक्षकांना विचारांच्या गाभ्यापर्यंत नेले.
त्यानंतर अकोल्याचे नामवंत शाहिर लुकमान शहा ताज आणि बुलढाण्याचे सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंग यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित पोवाडे आणि प्रेरणादायी गीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने इतिहासाची पाने जिवंत झाली. त्यांनी गायलेल्या पोवाडे आणि गीतांमधून प्रेक्षकांना प्रेरणादायी ऊर्जा मिळाली. त्यांच्या आवाजातील जोश, शब्दांमधील धारेमुळे सभागृहात मंत्रमुग्धता पसरली.
हेही वाचा – ‘फुले चित्रपटातील दृश्यांना कात्री नको’; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
दुपारच्या सत्रात ‘महामानवांच्या विचारांची संगीतमय मैफिल’ या विशेष कार्यक्रमात गझल गायक अशोक गायकवाड, संगीत विशारद निलेश कसबे आणि गायक प्रशांत पवार यांनी आपल्या सादरीकरणातून महामानवांच्या विचारांना संगीताच्या माध्यमातून शब्दबद्ध केले. त्यांनी गाण्यातून सामाजिक न्याय, शिक्षण, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अत्यंत भावनिक आणि प्रभावी पद्धतीने मांडले. यानंतर ‘युगपुरुष’ या गीतगायनाच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताच्या संविधानावर आधारित गीते सादर केली. ही गीते ऐकताना प्रेक्षकांना संविधान ही केवळ कायद्याची गोष्ट नसून ती आपल्या अस्तित्वाशी जोडलेली मूल्यव्यवस्था असल्याची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच दीपक म्हस्के, पौर्णिमा भोर आणि विकास गायकांबळे यांनी केले.