पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने उदय सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार

पिंपरी : पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी मा. ना. उदयजी सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांची ते पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असतांना भेट घेतली व त्यांची महाराष्ट्र विधान सभेवर पुन्हा निवड झाली तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री फेर निवड करण्यात आल्या निमित्ताने त्यांचे स्वागत, हार्दिक अभिनंदन व सत्कार पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, स्विकृत संचालक संजय भोसले उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांची चिंचवड येथे भेट घेतल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यावर चर्चा केली. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी येथील CETP प्लांट संदर्भात चर्चा करून हा प्लांट सध्या दिड एकरात चालू केला होता, परंतु त्याचे काम सध्या बंद आहे. त्या प्लांटला जागा कमी पडत आहे. एम.आय.डी.सी.ने नवीन चार एकर जागेची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी केली आहे. पिंपरी येथील एफ 2 ब्लॉक मधील अग्निशमन केंद्र तयार करावे यासाठी संघटना गेली दहा वर्षे महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे, परंतु त्याला काही आजपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना ही पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही. या औद्योगिक परिसरातील घातक कचरा एकत्र करून तो रांजणगाव एम.आय.डी.सी.मध्ये नेला जातो व तेथे त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु हा कचरा खाजगी यंत्रणेद्वारे एकत्र गोळा केला जातो, त्यामुळे त्याचा संकलन व विल्हेवाट लावण्याचा खर्च हा लघुउद्योजकांना परवडत नाही, या करिता ही सोय पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे करण्यात यावी अशी लघुउद्योजकांची मागणी आहे.
हेही वाचा – ‘बीआरटी’तील घुसखोरी ३९ हजार चालकांना भोवली; ११ महिन्यांत ३ कोटी ७१ लाखाचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील काही उद्योजकांचे उद्योग वाढ झाल्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या चाकण औद्योगिक परिसरात MIDC कडून औद्योगिक भूखंड खरेदी केले, परंतु MIDC ने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना सर्व मोबदला नदिल्यामुळे स्थानिक मूळ शेतकरी हे ज्यांनी MIDC कडून प्लॉट खरेदी केले होते त्या लघुउद्योजकांना सदर प्लॉट मध्ये बांधकाम करून देत नाहीत. चाकण औद्योगिक परिसरातील या शेतकऱ्याकडून लघु उद्योजकांना होणारा त्रास या समस्यावर देखील चर्चा करण्यात आली.
वरील समस्यावर मा. उद्योग मंत्री साहेब यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त यांना तात्काळ फोन करून CETP प्लांट, घातक कचरा प्रकल्प व अग्निशमन केंद्र यांचे काम तातडीने सुरु करण्याबाबत सूचना दिल्या व चाकण येथे मुळ शेतकऱ्यांबाबत पोलीस बंदोबस्त देऊन बांधकाम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
तसेच पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांच्या ज्या काही राहिलेल्या समस्या असतील त्या करिता लवकरच एक खास बैठक घेऊन सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन मा. मंत्री साहेबांनी दिले.





