झाडांच्या फांद्याचा वाहनधारकांना अडथळा : नाशिक फाटा येथील स्थिती
पिंपरी : नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलावर भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला वाढलेल्या झाडांच्या फांद्याचा वाहनधारकांना अडथळा होत आहे. फांद्या लागून अपघाताला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. या फांद्या छाटण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलावर भोसरीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. उड्डाणपुलावरून भोसरीकडे जाताना रस्त्याला उतार असल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असतो. या बाजूलाच झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून त्या रस्त्यावर येत आहेत.
परिणामी वाहनधारकांना त्याचा अडथळा होत आहे. वाढलेल्या फांद्या संबंधीत विभागाने वेळेवर छाटणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी वाहन चालविताना अपघात होण्याची भीती वाहनधारकांमध्ये आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच संबंधीत विभागाला जाग येणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.