मराठीतून पोषण ट्रॅकर अॅपमुळे अंगणवाडी सेविकांचे काम सोपे
पिंपरी : सध्या अनेक क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे अंगणवाडीदेखील अपडेट होत आहे. अंगणवाडीमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅकर अॅपमध्ये केली जाते. मध्यंतरी पोषण ट्रॅकर अॅपमध्ये बदल करण्यात आला असून हे अॅप इंग्रजी भाषेतून होते. संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेतून भरावी लागत असल्याने काही वयस्क अंगणवाडीसेविका तसेच काही सेविकांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात होते; मात्र, आता पोषण ट्रॅकर अॅप मराठी भाषेत झाल्याने अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे.
केंद्र शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनुसार राज्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोषण अभियानामध्ये रिअल टाईम मॉनिटरिंगअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविकांना व मुख्यसेविका तसेच तांत्रिक मनुष्यबळ यांना 2019 मध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून दिले होते. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 361 अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांनी 2021 मध्ये कामासाठी दिलेले स्मार्ट फोन कामांसाठी त्रासदायकच जास्त ठरू लागल्याने अखेर शासनाकडे जमा केले होते. त्या वेळी आम्हाला चांगले मोबाईल देऊन त्यामध्ये पोषण ट्रॅकर मराठी अॅप देण्याची मागणी केली होती. मात्र, तीन वर्ष झाले तरी नवीन स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळाले नव्हते. त्यानंतर मे 2024 मध्ये नवीन स्मार्ट फोन मिळाले मात्र, पोषण ट्रॅकर अॅप इंग्रजी भाषेमध्ये होते. इंग्रजीमध्ये अॅप असल्याने अंगणवाडी सेविकांना माहिती भरणे कठीण जात होते.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस अर्बन अर्बन नक्षलवादाचे कमांडर’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
अंगणवाडी सेविका सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत पोषण ट्रॅकर हे अॅप गरोदर, स्तनदा मातांना पुरवल्या जाणार्या सेवेचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचार्यांना दिले आहे.
अंगणवाडी सेविका यांचे शिक्षण कमी असते; तसेच काही अंगणवाडीसेविका वयस्क आहेत. त्यामुळे त्यांना इंग्रजीमधून माहिती भरण्यासाठी दुसर्यांची मदत घ्यावी लागते. दररोज अंगणवाडी सेविका या कामासाठी कोणाची मदत कशी घेणार, यापूर्वीदेखील संबंधित न्यायालयाने सदर अॅप मराठी भाषेतून का उपलब्ध करून दिले जात नाही, अशी सरकारला विचारणा केली होती. गेली काही दिवसांपासून हे अॅप मराठीमध्ये अपडेट करण्यात आले आहे.