बोपखेलमध्ये आता दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग
![Now sub-division of Dighi tax collection office in Bopkhel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/hiranani-ghule-pcmc-bjp.jpg)
नागरिकांची होणार सुविधा : उपमहापौर हिरानानी घुले यांचा पाठपुरावा
पिंपरी । प्रतिनिधी
बोपखेलमधील नागरिक आणि मिळकतधारकांना करभरणा करण्यासाठी दिघीत जावे लागत होते. ही पायपीट आता बंद होणार असून, १४ फेब्रुवारीपासून बोपखेलमध्ये कर संकलन कार्यालयाचा उपविभाग सुरू करण्यात येत आहे. याबाबत उपमहापौर हिरानानी घुले यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे.
याबाबत महिती देताना आयुक्त राजे श पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग बोपखेल येथे येत्या १४ फेब्रुवारीपासून नव्याने सुरु करण्यात येणार आहे. कॅश काउंटरसह सुरु होणा-या या उपविभागात करआकारणी संबंधीत अर्ज आणि भरणा स्वीकारला जाईल.
दिघी-बोपखेल करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढते नागरीकरण, वाढती मिळकत संख्या आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करता दिघी करसंकलन कार्यालयातील काही गटांचे तसेच कामकाजाचे विभाजन करून प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नवा उपविभाग सुरु केला जात आहे.
बोपखेल गावठाण येथील मारुती मंदिराजवळील महापालिकेच्या इमारतीमधील तळमजल्यावर कॅश काऊंटरसह उपविभाग सुरु होत आहे.
बोपखेल येथील उपविभाग दिघी-बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालय हे इ क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली राहील. या उपविभागाअंतर्गत आवक जावक टपाल कक्ष, वसुली आणि भरणा, कर आकारणी, पाणीपट्टी आकारणी तसेच कॅश काउंटर विषयक सर्व कामकाज करण्यात येणार आहेत. दिघी-बोपखेल विभागीय कार्यालयात गट क्रमांक १ ते ३ हे गट दिघी-बोपखेल करसंकलन कार्यालय कार्यरत राहील. तसेच प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या कार्यालयात गट क्रमांक ४ संबधित करआकारणी बाबत अर्ज तसेच भरणा स्विकारला जाणार आहे.