चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल कोविड सदृश्य रुग्णालय म्हणून घोषित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Niramaya.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल हे कोविड सदृश्य रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांना रिपोर्ट येईपर्यंत निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाधित नागरिकांच्या संपर्कातील लोकांना चाचणी करावी लागते. अनेकांना कोरोनाची लक्षणे असतात. परंतु, रिपोर्ट येईपर्यंत नागरिकाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे हे लक्षात येत नाही. कोणते उपचार घ्यावेत हे समजत नाही.
काही व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवतात. परंतु, कोरोनाची टेस्ट होईपर्यंत सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह किंवा निगेटिव्ह हे निश्चित होत नाही. तोपर्यंत त्या व्यक्तीस उपचार मिळण्यास अडचण येत आहेत. त्यासाठी चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल हे कोविड सदृश्य रुग्णालय (Covid Suspect Hospital) म्हणून घोषित केले आहे. ज्यामध्ये असे रुग्ण जावून उपचार सुरु करतील. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार पध्दती निश्चित करण्यात येईल.
पालिकेला सहकार्य न करणाऱ्या कोविड रुग्णालयांना सक्त ताकीद
शहरातील 101 हून अधिक कोविड रुग्णालयांना महापालिकेने मान्यता दिली आहे. रुग्णालयांनी त्यांच्याकडील खाटांची संख्या महापालिकेला कळवणे आवश्यक आहे. काही ठिकाणी त्याबाबत महापालिकेला सहकार्य केले जात नाही असे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णालयांना आयुक्त राजेश पाटील यांच्या स्वाक्षरीने लेखी सक्त सूचना दिल्या आहेत. यापुढे अशा रुग्णालयांनी महापालिकेला सहकार्य न केल्यास साथ रोग अधिनियम 1987, आपत्ती व्यवस्था अधिनियम 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.