निलेश गटणे यांच्या संपत्तीची व भूमिकेची चौकशी करा
भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील माझी SRA योजनेतील कथित अनियमितता, आर्थिक भ्रष्टाचार, बोगस नावनोंदणी, व दबावाखाली घेतलेल्या सह्यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निगडी सेक्टर २२, सम्राट नगर, संग्राम नगर व परिसरात एकूण ७२ ठिकाणी SRA योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून माजी प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रकल्प मंजूर झाले आहेत. मात्र, या प्रकल्पांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून, अनेक ठिकाणी झोपडपट्टी धारकांच्या खोट्या नावनोंदणी, दमदाटी व जबरदस्तीने सह्या घेण्याचे प्रकार समोर आले आहेत.
काळभोर यांनी आरोप केला आहे की, संरक्षण क्षेत्रातील बाधित भूखंडांवर नियमबाह्य पद्धतीने हे प्रकल्प राबवले जात असून, त्यातून बिल्डर आणि काही राजकीय नेत्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला आहे. टि.डी.आर. (TDR) घोटाळा करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आला असून, या व्यवहारात नगररचना विभागातील काही अधिकारी व बिल्डर्स यांची आर्थिक मिलीभगत झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : ‘‘एसबीपीआयएम’’ शैक्षणिक स्वायत्तता अभिमानास्पद; ज्ञानेश्वर लांडगे
महत्वाचे म्हणजे, यासंदर्भात एक वर्षांपासून वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा दावा करत त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
निलेश गटणे यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी.
झोपडपट्टी धारकांवरील अन्याय, दमदाटी आणि बनावट नावनोंदणी प्रकरणी स्वतंत्र चौकशी व्हावी.
७२ प्रकल्पांच्या मंजुरी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची तपासणी व्हावी.
संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन राज्य सरकारने कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.




