Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीविरोधात राष्ट्रवादीचाच इच्छुक उमेदवार मैदानात?

चिखलीतील विकास साने महापालिकेवर केली ‘चाल’ 
पाणी कपातीविरोधात प्रशासक, आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक कारभार सुरू आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील सर्वेसर्वा आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, सध्या महापालिकेचे कामकाज सुरू आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार महापालिकेवर ‘चाल ’ करुन गेले. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विकास साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुलमी पाणी कपातीविरोधात हंडा मोर्चा आंदोलनाचे नियोजन केले आहे. चिखलीकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाला आता खडबडून जागे करण्यात येणार आहे. त्यासाठी साने यांनी शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढला.
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे. याचा पुरेपूर फायदा उठवत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून आंदोलन-निवेदने आणि सभा-बैठकांचा ‘फार्स’सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले विकास साने यांनी यापूर्वीही रस्ते, पाणी आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. लोकांसाठी प्रशासनाशी भांडणारा जनसेवक अशी ओळख निर्माण करणारे विकास साने चिखली येथील राष्ट्रवादीचे धडाडची नगरसेवक स्व. दत्ताकाका साने यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत साने यांचे राष्ट्रवादीकडून तिकीट ‘कन्फर्म’मानले जाते.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात असताना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात केलेली आंदोलने रास्त मानता येतील. पण, महापालिकेत प्रशासक राज अर्थात राज्य सरकार म्हणजेच महाविकास आघाडीची नियंत्रण असताना पाणी कपात किंवा समस्येबाबत राष्ट्रवादीच्याच इच्छुकांनी प्रशासनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यास राष्ट्रवादीला ‘घरचा आहेर’म्हणावा लागेल. परिणामी, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आठवड्यातील एक दिवस उपमुख्यमंत्री कार्यालयातील स्वीय सहायक पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पार्टी कार्यालयात ठाण मांडून असतात. पाणी कपातीबाबत विकास साने यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यशस्वी पाठपुरावा करता आला असता. आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून तात्काळ कार्यवाही करता आली असती. विशेष म्हणजे, ही समस्या मार्गी लावून राष्ट्रवादीला श्रेयही घेता आले असते. मात्र, ‘स्टंटबाजी’च्या प्रयत्नांमुळे विकास साने अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अजित गव्हाणेंचा समन्वय कमी पडतो आहे काय?
महापालिका प्रशासनाविरोधात अर्थात महाविकास आघाडीच्या प्रशासकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इच्छुक उमेदवार थेट आंदोलन उभा करतो. प्रशासन अर्थात अप्रत्यक्षपणे राज्य शासनाविरोधात जनभावना होईल, असे कृत्य करतो. याबाबत शहराध्यक्ष म्हणून अजित गव्हाणे हस्तक्षेप करीत नाही. याउलट, विकास सानेंच्या हंडा मोर्चा आंदोलनाच्या पोस्टवर राज्यातील, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो झळकतात. महापालिका, प्रशासनाविरोधात मोर्चा काढून स्टंटबाजी केली जाते. या सर्व प्रकाराबाबत शहर संघटनेचे प्रमुख या नात्याने काहीही कार्यवाही करीत नाहीत. विशेष म्हणजे, शहर कार्याध्यक्षपदी फझल शेख यांची नियुक्ती स्वत: अजित पवार यांनी केली. त्यावेळीसुद्धा अजित गव्हाणे शहराध्यक्ष म्हणून उपस्थित नव्हते. यचा अर्थ गव्हाणे इच्छुक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यात गव्हाणे कमी पडतात काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा फार्स..?
भारतीय जनता पार्टीने २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला. २० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. पाच वर्षांच्या काळात योगेश बहल, स्व. दत्ताकाका साने, विठ्ठल उर्फ नाना काटे, राजू मिसाळ आदींनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले. मात्र, दत्ताकाका साने वगळता एकाही विरोधी पक्षनेत्यांनी तत्कालीन सत्ताधारी भाजपाची कोंडी केली नाही. आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाणी, कचरा, रस्ते आणि भ्रष्टाचार असे विषय पुढे करुन राष्ट्रवादीची स्थानिक मंडळी रान पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमदेवार निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनांचा फार्स करीत आहेत काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button