चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
![Murder of wife on suspicion of character; The body was found in a decomposed state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Women-Murder-attack.jpg)
पिंपरी चिंचवड | रावेत परिसरात एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेआठच्या सुमारास जाधववस्ती, रावेत येथे उघडकीस आली.
खैरून बी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय 38, रा. जाधव,वस्ती, रावेत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मलिक शेंकुबर नदाफ (वय 39, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत खैरून बी हैदर नदाफ यांचे लग्न झाले आहे. मात्र पतीसोबत भांडण झाल्याने त्या मागील काही दिवसांपासून मुलासोबत जाधववस्ती येथे राहत होत्या. मागील दोन दिवसांपासून खैरून बी घराबाहेर दिसल्या नाहीत अशी माहिती शेजारी राहणा-या महिलेने खैरुन बी यांचा मित्र फिर्यादी मलिक यांना दिली.
बुधवारी रात्री मलिक हे खैरुन बी यांच्या घरी आले. घरात बघितले असता खैरुन बी या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. सलीम यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी पती हैदर याने खैरून बी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण केले. खैरून बी मुलाला घेऊन रावेत येथे राहण्यास आल्याच्या रागातून त्याने वस्त्राच्या नाडीने गळा आवळून खैरून बी यांचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी रावेत पोलीस आणखी तपास करीत आहेत.