महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 : नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी
![महापालिकेच्या जाहिरात फलकांच्या उत्पन्नात वाढ; फलकांमधून 12.58 कोटींचा महसूल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/smart-city-pcmc.jpg)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर शुक्रवार (दि. 25) फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली असून ते प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणार आहेत.
राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. यावेळी राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेले प्रारुप नकाशे अणि आदी सूचना प्रसिध्द करण्यात आली. 14 फेब्रुवारीपर्यंत नागरीकांमार्फत त्यावर हरकती आणि सूचना घेण्याकामी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे 5 हजार 684 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. या प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर 25 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे सकाळी १० 0वाजता सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
हरकतदारांना या सुनावणीची नोटीसदेखील पाठवण्यात आली आहे. मात्र ज्या हरकतदारांना नोटीस प्राप्त झाली नसेल त्यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील निवडणूक कार्यालयातून ती प्राप्त करून घ्यावी, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. सुनावणीला येताना हरकतदारांनी आपल्यासोबत हरकत अर्ज दाखल केल्याची पोहोच, सुनावणी नोटीसीची प्रत, स्वतःचे कोणतेही एक ओळखपत्र घेऊन यावे तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र, मास्क, सॅनिटायझर सोबत बाळगावे, आदी सूचना देण्यात आल्या आहेत.