महापालिका वारक-यांच्या स्वागताची कमान उभारणार
![Municipal Corporation will set up a reception arch for Waraks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/1520094044768.jpg)
पिंपरी चिंचवड | देहू-आळंदी रस्त्यावर वारक-यांचे स्वागत करणारी कमान पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार आहे. देहू महापालिका हद्दीवर कमान उभारण्यासाठी मे किमया यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निविदा स्वीकृत रकमेच्या 1.95 टक्के फी त्यांना देण्यात येणार आहे.पिंपरी महापालिकेच्या हद्दीलगत पूर्वेस श्री क्षेत्र आळंदी व उत्तर पश्चिमेस श्री क्षेत्र देहू अशी दोन तिर्थक्षेत्रे आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आळंदी व देहू येथे येत असतात. सद्यस्थितीत देहू आळंदी हा मार्ग बीआरटीएस विभागामार्फत विकसित करण्यात आले आहे. याच 30 मीटर रुंदीच्या मार्गावरुन भाविक आळंदी ते देहू असा प्रवास करत असतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातुनही या तिर्थक्षेत्रास भेट देण्याकरिता भाविक येत असून त्यांचा या मार्गावरील बहुतेक सर्वच प्रवास पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतुन होत असतो. तथापि, या मार्गावर महापालिकेमार्फत कोठेही स्वागत कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्यात आलेले नाही.
या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरुवातीस स्वागत कमान उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक करत आहेत. महापालिकेच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकात विशेष योजना या लेखाशिर्षाअंतर्गत प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. 76 लाख 35 हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. देहू-आळंदी रस्त्यावर देहू महापालिका हद्दीवर स्वागत कमान उभारण्यासाठी वास्तुविशारद नेमण्यासाठी महापालिकेने दर मागविले होते. त्यात तिघांनी समावेश घेतला. त्यातील मे किमया यांचा 1.95 टक्के इतका लघुत्तम दर प्राप्त झाला आहे.
या कामाचे नियोजन करुन आराखडे तयार करणे, शोभिकरणाच्या बाबींचे दरपृथ्थकरण करणे, त्यानुसार पूर्वगणक पत्रक करणे, निविदा बनविणे, निविदापश्चात कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी मे किमया यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदा स्वीकृत रकमेच्या 1.95 टक्के फी देण्यात येणार आहे.