लाडकी बहीण योजनेसाठी महापालिकाही अर्ज स्वीकारणार
![It is mandatory to write mother's name before candidate's name on government documents](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Pimpri-Chinchwad-1-780x470.jpg)
पिंपरी : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी महापालिका क्षेत्रीय कार्यालयनिहाय सोमवार (दि.८) पासून अर्ज स्वीकारणार आहे. त्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.
शिबिरासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी यांनी कामकाज पाहणार आहेत. राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच, त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेस पात्र असणार आहे. पात्र लाभार्थीनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.
हेही वाचा – पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर
अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र असावे किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. कुटुंब प्रमुखांचा २ लाख ५० हजारांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे. पिवळे आणि केसरी रेशनकार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. शिबिराच्या ठिकाणी जाऊन अर्ज भरून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज विकास विभागाने केले आहे.