महापालिकेतील ‘गुरूजी’ला आयुक्त राजेश पाटलांनी ‘धडा शिकवला’
![Municipal Corporation 'Guruji' was taught a lesson by Commissioner Rajesh Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Pimpri-Chinchwad-Mahanagar-Palika-1.jpg)
कामगारांची फसवणूक प्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आठ ते दहा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या स्वच्छता ठेकेदारांना आता पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दणका दिला आहे. बनावट एफडीआर सादर करून पालिकेला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या डझनभर कंत्राटदारांविरुद्ध फसवणुक व बनावटगिरीचे गुन्हे दाखल केल्यानंतर आता गरिब व अशिक्षित स्वच्छता कामगारांची पिळवणूक करणारा सफाई ठेकेदार व या कंपनीचे संचालक व अधिकारी अशा १५ जणांविरुद्ध पालिकेने फौजदारी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा पालिका ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, १५ पैकी सात आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याची माहिती तपासाधिकारी भोजराज मिसाळ यांनी दिली. तर, उर्वरित आऱोपींना पकडण्यासाठी एक पोलिस पथक भाईंदरला (जि.ठाणे) गेले आहे.
चंदन जलधर मोहंती (वय ३६), प्रमोद ऊर्फ प्रमोदकुमार प्रफुल्ल बेहरा (वय ३९), कार्तिक सुर्यमणी तराई (वय ५१), नितीन गुंडोपंत माडलगी (वय ५१), विश्वनाथ विष्णू बराळ (वय ४०), स्वप्नील गजानन काळे (वय ३२, सर्व रा. चिंचवड) आणि श्रीमती चंदा अशोक मगर (वय ४०, रा. निगडी) अशी अटक केलेल्या ठेकेदार संस्थेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर, संचालक हायगरीब एच. गुरु (वय ६०), सहसंचालक मीनाक्षी एच. गुरव (वय ३६, दोघेही रा. भाईंदर पूर्व, जि.ठाणे), पवन संभाजी पवार (वय २९, रा. तळवडे), बापू पांढरे (वय ३५, रा.रहाटणी), अक्षय चंद्रकांत देवळे (वय २६), नंदू ढोबळे (वय ३५) धनाजी खाडे (वय ४०,रा. तिघेही निगडी) आणि ज्ञानेश्वर म्हांबरे (वय ४०, रा. चिखली) अशी अद्यापपर्यंत अटक न झालेल्या इतर आऱोपींची नावे आहेत.
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेकेदारांविरुद्ध कारवाई राजेश पाटील हे आयुक्त म्हणून आल्यावर अल्प काळात झाली आहे. त्यांनी प्रथम बनावट एफडीआऱव्दारे पालिकेची फसवणूक करणाऱ्या १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले. नंतर टप्याटप्याने त्यांच्याविरुद्ध त्यांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या कंत्राटदारांशी संगनमत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. तर, त्यांच्याशी आर्थिक हितसबंध असलेले पालिका पदाधिकारीही धास्तावले आहेत. या कारवाईमुळे कंत्राटदार-अधिकारी या युतीला काहीसा ब्रेक लागला आहे. मात्र, पदाधिकारी-ठेकेदार अभद्र युती कायम आहे.
गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.असे पिंपरी पालिकेसह स्वच्छता कामगारांचा विश्वासघात, फसवणूक केलेल्या भाईंदर पश्चिम येथील ठेकेदार कंपनीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कंपनी व तिचे संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचाही गंभीर असा अजामीनपात्र गुन्हा पिंपरी पोलिसांनी नोंद केला आहे. पालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने फिर्याद दिली आहे.
गेल्या साडेतीन वर्षापासून ही ठेकेदार कंपनी आपल्या कामगारांचे शोषण करीत होती. त्यांना किमान वेतन न देता त्यांचा विश्वासघात करीत होती. कमी पगार देऊन ते पालिकेची फसवणूक करीत होते. कारण पालिकेकडून ही कंपनी किमान वेतनानुसार या कामगारांचा पगार घेऊन तेवढा ती देत नव्हती.
प्रत्येक कामगाराच्या पगारातून दर महिन्याला चार हजार रुपयांची खंडणीही उकळली जात होती. याप्रकारे आतापर्यंत त्यांनी आठ ते दहा कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा अंदाज तपासाधिकारी मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. अशिक्षित कामगारांच्या अंगठे, तर बाकीच्यांच्या सह्या धमकावून घेत त्यांनी कामगारांची एटीएम कार्डही स्वत:कडेच ठेवून घेतली होती. किमान १३ हजार रुपये वेतन मागणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकीही त्यांनी दिली होती.