महापालिका प्रशासकाची स्थायी समितीची बैठक आता मंगळवारी होणार : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप
![Municipal Administrator Standing Committee meeting will now be held on Tuesday: Additional Commissioner Ulhas Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pimpri-chinchwad-PCMC.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत आर्थिक विषयांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीची साप्ताहिक बैठक दर मंगळवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. महासभेची मान्यता आवश्यक असलेले प्रस्ताव प्रशासकाकडे पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या ५ आणि २० तारखेला दुपारी तीन वाजता बैठक होईल. तर, विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी दुपारी तीन वाजता प्रशासकाकडे पाठविता येणार आहेत. या बैठकांना विभागप्रमुखांनी संबंधित माहितीसह उपस्थित राहावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समिती, महासभेचे सर्व अधिकार प्रशासकाकडे गेले आहेत. यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत महापालिका सभा, स्थायी समिती, विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेने आयुक्तांनी अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांच्या मान्यतेने नगरसचिव कार्यालयाकडे पाठविण्यात येत होते. परंतु, नगरसेवक नसल्याने महापालिका अधिनियमाखालील सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि सर्व कामे, कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव दर मंगळवारी महासभेची मान्यता आवश्यक असलेले प्रस्ताव प्रत्येक महिन्याच्या ५ आणि २० तारखेला आणि विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे विहीत नमुन्यातील प्रस्ताव पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी मुदतीत पाठवावेत.
विषयपत्रांचे नमुने केले तयार
प्रशासकाच्या मान्यतेसाठी विषयपत्र कसे पाठवावे, याचा नमुनाही तयार केला आहे. नगरसचिवांच्या नावाने विषयपत्र पाठवावे. विषयपत्रात फक्त मान्यता घ्यावयाच्या कामाचा संक्षिप्त आशय नमूद करावा. आशयाचा ठरावात समावेश करण्यात येईल. विषयपत्रावर आयुक्तांची अथवा आयुक्तांनी विषयपत्रावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर विषयपत्र नगरसचिव विभागाकडे नेहमीच्या पद्धतीने पाठवावे लागणार आहे.