पिंपरी कॅम्प भाजी मंडईतील बहुमजली पार्किंगसाठी महापालिका प्रशासनाच्या ‘जोर-बैठका’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210712-WA0174.jpg)
२० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; खासदारांनी केल्या सूचना
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील प्रस्तावित बहुमजली पार्किंग तत्काळ विकसित करावी. यासाठी महापालिका भवनात जोर – बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान सोमवारी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठक घेऊन नवीन प्लॅननुसार भाजी मार्केट बांधण्यात यावे. विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात, अशा सूचना महापालिका अधिका-यांना केल्या.
पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील विविध समस्या तसेच मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पातील लाभधारकांना सदनिका वाटप आदी विषयांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. शहर अभियंता राजन पाटील, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथे बहुमजली पार्किंगचा प्लॅन केला आहे. पण, वीस वर्षापासून पार्किंग विकसित करण्यात आले नाही. भाजीपाला , फळे विक्रेत्यांना गाळे देण्यात येणार आहेत. पार्किंग लवकरात लवकर विकसित करावी. काही विक्रेते रस्त्यावर बसतात. त्यांचीही व्यवस्था करावी. मंडईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, साफसफाई तसेच मंडईची रंगरंगोटी करावीत. लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई असा एलईडी नामफलक लावण्यात यावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
त्यावर लवकरच बहुमजली पार्किंगची निविदा काढली जाईल. नवीन प्लॅननुसार भाजी मार्केट बांधण्यात येईल असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. तसेच मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभधारकांना तातडीने सदनिका वाटप करण्याच्या सूचनाही खासदार बारणे यांनी यावेळी अधिका-यांना केल्या.