खासदार श्रीरंग बारणे गद्दार नव्हे ‘खुद्दार’… बनणार ‘हॅट्ट्रीक’चे हक्कदार!
![MP Srirang Barne is not a traitor but a 'Khuddar'... He will become entitled to 'Hattrick'!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Eknath-Shinde-Barne.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरेंच्या विचारांशी ‘गद्दारी’न करता हिदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपाशी युती करावी. ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर काँग्रेस- राष्ट्रवादीविरोधात संघर्ष केला. त्यांसोबतची महाविकास आघाडी तोडावी, अशी मागणी करीत शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या आणि स्वाभीमानी शिवसेनाचा प्रयोग केला. राज्यातील राजकीय भूकंपाचे हादरे आता पिंपरी-चिंचवडपर्यंत येवून पोहोचले. शहरातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अखेर शिंदे गटात सहभागी होत बाळासाहेबांच्या विचारांशी ‘खुद्दार’अर्थात प्रामाणिक असल्याचे जाहीर केले.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेला अखेर रामराम ठोकला. आगामी राजकीय वाटचाल सक्षम होत असतानाच भाजपाच्या मदतीने पुन्हा मावळातून २०२४ मध्ये हॅटट्रीक साधण्याचा मार्ग सोपा केला आहे. दरम्यान, शहर शिवसेनेत आता फूट पडली असून, बारणे गट शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून २०१४ ला माजी खासदार गजानन बाबर यांना डावलून शिवसेनेतून बारणे यांना उमेदवारी दिली होती. तसेच, २०१९ ला देखील पक्षाने त्यांना तिकीट देऊन त्यांच्यामागे ताकद उभी केल्याने त्यांना खासदारकीची दुसरी टर्म गाजवता आली. लोकसभा निवडणूक भाजपा- शिवसेना युतीद्वारे लढवण्यात आली. चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजकीय वैर बाजूला ठेवून पक्षादेशानुसार बारणे यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. परिणमी, पिंपरी-चिंचवडमधून बारणेंना मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्याच्या जोरात बारणे यांनी पवार कुटुंबातील पार्थ पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
बारणेंनी अचूक टायमिंग साधले…
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या शब्दासाठी मावळ मतदार संघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा लागण्याचे संकेत खासदार बारणे यांना मिळाले आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून तिकीट कापले गेल्यास, राजकीय वाटचाल संकटात येणार, अशी स्थिती असल्यामुळे बारणेंनी अचूक ‘टायमिंग’ साधले. आगामी निवडणुका या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा एकत्रित लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे मावळातून बारणेंची उमेदवारी पक्की झाली असून, तिसऱ्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहर शिवसेनेत उभी फूट…
पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार बारणे यांचा काही कार्यकर्त्यांचा एक गट सक्रिय आहे. बारणे यांचे पुतणे माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी आमदार एड. गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे बारणे याचे कट्टर कार्यकर्ते आहेत. तसेच, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील एक मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेत मोठी फूट पडली असून, त्याचा फायदा थेट भाजपाला होणार आहे.
संसदपटू बारणे शहराला न्याय देतील…
सलग दोनदा संसदेत पिंपरी-चिंचवडचे नेतृत्तव करणारे खासदार श्रीरंग बारणे संसदरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत. केंद्र सरकारशी संबंधित विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी खासदार बारणे आता पुढाकार घेतील, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.