इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले म्हणून आई रागावली; मुलीने सोडले घर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/social-media.png)
पिंपरी l प्रतिनिधी
मुलीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. त्यामुळे तिची आई तिला ओरडली. आईवर रागावलेल्या मुलीने थेट घर सोडले. मात्र मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईला आहे. याबाबत 49 वर्षीय आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीने तिचे फोटो इंस्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे फिर्यादी मुलीला रागावल्या. त्या कारणावरून मुलगी बुधवारी (दि. 15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरातून निघून गेली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही.
फिर्यादी यांच्या मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. त्याबाबत त्यांनी अपहरणाची फिर्याद दिली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.