“आधुनिक तंत्रज्ञान हे साधन, पण गुरु म्हणजे मार्ग”: डॉ. दीपक शहा
गुरुपौर्णिमेचे भव्य आयोजन: विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करत गुरुवंदना अर्पण केली, तसेच मातृपूजन करून उपस्थित मातांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमास अनेक पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आज आपण आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स आणि व्हर्च्युअल टीचर्सच्या युगात आहोत. या सगळ्यामुळे माहिती सहज मिळते, पण खरे ज्ञान, अनुभव आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्याची समज हे केवळ एक ‘मानवी गुरु’च देऊ शकतो. त्यामुळे शिक्षकाचे स्थान हे सदैव सर्वोच्च राहील.”
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी आसावरी बदडे हिच्या सरस्वती वंदना व गुरुवंदनाने झाली. त्यानंतर ओवी शिखरे हिने नृत्यरूपात गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाला एक वेगळेच आध्यात्मिक स्वरूप दिले. कार्यक्रमात संस्थेत नुकतेच रुजू झालेले नृत्य शिक्षक संकेत साकोरे व ओवी शिखरे यांची विद्यार्थ्यांशी ओळख करून देण्यात आली. वर्षभर विद्यार्थ्यांना नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा – पावसाच्या साचलेल्या पाण्याची समस्या अखेर निकालात!
यानंतर गुरूजनांचा सन्मान करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंबद्दल असलेला आदर आणि कृतज्ञता शब्दांत व्यक्त करत कार्यक्रमात भावनिक रंग भरले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अर्चना गांगड व सर्व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
सांस्कृतिक सोहळा प्रेरणादायी…
या प्रसंगी संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, तसेच हितेन करानी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन बारावीच्या विद्यार्थिनी आस्था शहा, ईश्वरी शहा, स्वरा तापकीर आणि आभा ओझा यांनी केले, तर अकरावीतील सिद्धांत अग्रवाल याने मनःपूर्वक आभार प्रदर्शन केले. या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गुरूप्रती आदर, मूल्यशिक्षण आणि भारतीय परंपरेतील ‘गुरुशिष्य’ नात्याची जाणीव अधिक बळावली गेली, हे स्पष्टपणे जाणवले. प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने घडवलेला हा सांस्कृतिक सोहळा निश्चितच प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला.




