Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन PCMC : महापालिका निवडणुकीत सोसायटी प्रतिनिधींना उमेदवारी द्या!

फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे यांची मागणी : सोसायटीधारकांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार हवा!

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या, हक्क आणि स्थानिक विकास यावर स्पष्ट, ठाम आणि परिणामकारक भूमिका घेत पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने आता स्थानिक राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला आहे. फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी – या तीनही विधानसभा मतदारसंघांत प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाने सोसायटी प्रतिनिधींना उमेदवारी व प्रतिनिधित्व द्यावे. अन्यथा फेडरेशन स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल.”

“शहरातील ८०-९०% नागरिक विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहतात. शहराचा आर्थिक, सामाजिक आणि नागरी चेहरा हे हेच मतदार घडवतात. पण या सोसायटींना आजवर महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळालेले नाही. हे प्रतिनिधित्व नसणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे.” “निवडणुकांच्या वेळेस या मतदारांकडे ‘बॅंकर वोटबँक’ म्हणून पाहिले जाते, मात्र निर्णय घेणाऱ्या पातळीवर सोसायटीतील जाणकार, जागरूक आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उमेदवारी दिली जात नाही. पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन गेली काही वर्षे शहरातील विविध प्रश्नांवर कार्यरत आहे. परंतु मागील वर्षभरात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर ठाम भूमिका घेतली आहे.

फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटींसाठी पाणी कनेक्शन व बिल आकारणीचा तिढा, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा, टँकरमुक्त सोसायटी, महापालिकेचा एसटीपी प्रकल्प व त्यात होणारा खर्च सोसायट्यांवर ढकलणे, रस्त्यांच्या रुंदीकरणात होणाऱ्या सोसायट्यांच्या नुकसानांची भरपाई, सोसायटी व्यवस्थापनांवर होणाऱ्या अन्यायकारक दंडात्मक कारवाया, या पार्श्वभूमीवर फेडरेशनने केवळ एक सामाजिक संस्था म्हणून मर्यादित न राहता, स्वतःचे राजकीय अस्तित्व सुद्धा निर्माण करावे अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा –  इंद्रायणीनगरमधील रस्त्यांचे काम तातडीने हाती घ्या

सचिन लोंढे म्हणाले की, “आजघडीला आपल्याला असे उमेदवार पाहिजेत, जे सोसायटीच्या प्रश्‍नांची जाणीव असणारे, तंत्रज्ञानसमज असलेले आणि प्रशासनाशी समन्वय साधू शकणारे असावेत. पारंपरिक राजकीय नेते हे अनेकदा केवळ पक्षीय कार्यक्रमापुरते मर्यादित असतात. गृहनिर्माण क्षेत्रातील बारकावे, कायदे, पर्यावरणविषयक प्रश्न, पाणीवाटप, सांडपाणी प्रक्रिया, स्मार्ट सिटी प्रकल्प यांची माहिती असणाऱ्यांनाच आता पुढे आणायला हवे.”

तीन विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारांची मागणी

फेडरेशनने आपली मागणी फार स्पष्टपणे मांडली आहे. त्यांनी शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येक पक्षाने किमान एक प्रतिनिधी फेडरेशनशी संलग्न सोसायटीचा निवडावा अशी अट मांडली आहे. “जर प्रमुख पक्षांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही आमचे उमेदवार उभे करू. शहरातील जनतेकडे आम्ही जाऊ आणि त्यांना एक पर्याय देऊ.’’ फेडरेशनच्या या भूमिकेमुळे शहरातील प्रमुख राजकीय पक्ष – भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांना सोसायटीच्या प्रतिनिधींना संधी देण्याबाबत विचार करावा लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“हिंजवडी आयटी हबमधील वाहतूक कोंडी असो, वाकडच्या दत्त मंदिर रोडचे रुंदीकरण, हवा-पाणी-नदी यांचे वाढते प्रदूषण असो, की पाणीपुरवठा आणि अतिक्रमणमुक्त फुटपाथची मागणी — आम्ही सर्वच स्तरांवर सातत्याने आवाज उठवला आहे. पुनावळेतील कचरा डेपोसारख्या मुद्द्यावर तर सोसायटीधारकांनी एकत्र येत यशस्वी लढाही उभारला. आता वेळ आली आहे की या आवाजाला प्रशासनाच्या दरबारात निर्णयक्षम प्रतिनिधित्व मिळावं. आम्ही केवळ प्रश्न मांडत नाही, तर त्यावर तोडगाही देतो — आणि हेच आमचं बळ आहे.”

— सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button