PCMC: इंद्रायणीनगरमधील रस्त्यांचे काम तातडीने हाती घ्या!
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणी : भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे; दुरुस्ती आणि डांबरीकरणाची मागणी
पिंपरी चिंचवड : इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमधील सेक्टर 9, 11, 13 येथील सर्विस रोड तसेच सेक्टर 4, 12 व एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था दूर करून आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजपाचे इंद्रायणीनगर मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत महापालिका क- प्रभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नरोटे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महानगरपालिका प्रशासनामार्फत आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना चालना मिळत आहे. मात्र इंद्रायणीनगरमधील काही रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः स्पाईन रोडलगतच्या सेक्टर 9, 11 आणि 13 मधील सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. यामुळे विद्यार्थी, महिला आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत.
हेही वाचा – ‘मान्सून’ देशातून २४ तासांत माघार घेणार! महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज…
एमआयडीसी परिसरात बस थांबांची व्यवस्था करा
एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची देखील तातडीने डागडुजी व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. या परिसरात सार्वजनिक वाहतुकीसाठी बस थांब्यांची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.या सर्व नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करून कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा लांडगे यांनी व्यक्त केली आहे.





