लस महोत्सवाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांची दिशाभुल – माजी आमदार विलास लांडे यांची टीका
![Misleading the citizens by the authorities in the name of vaccination festival - Criticism of former MLA Vilas Lande](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Vilas-lande-4.jpg)
– पार्थ दादा पवार युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांना मदत करणार
पिंपरी महाईन्यूज
करोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी शहरात अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पुरेशा लसीचा साठा नसताना हा महोत्सव करणार कसा? असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित केला आहे. तर लसीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पार्थ दादा पवार युवा मंचच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती माजी आमदार लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माजी आमदार लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद आहेत. करोनाच्या गंभीर संकटातही लसीचे राजकारण करून संकटाला महोत्सव म्हणून साजरे करणा-या केंद्रातील भाजप सरकार व पिंपरी चिंचवड महापालिका सत्ताधाऱ्यांचा निषेध केला पाहिजे.
‘संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रचंड वेगाने वाढत आहे. तो रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. पण केंद्र सरकारकडून पिंपरी चिंचवडला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. लस नसल्याने मधल्या काळात शहरात लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला पुरेशी लस पुरवण्याऐवजी पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांना मोफत लस पुरवत आहेत. राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही महाराष्ट्राला व शहराला मुबलक लसीचा पुरवठा केला जात नाही, अशी खंत माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रूग्णसंख्या व लोकसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपशासीत राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. करोनाने मोठ्या प्रमाणात रूग्णांचा मृत्यू होत असताना लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करत आहे. हे अत्यंत दुर्देवी व बेजबाबदार आहे. कुठल्याही संकटात जनतेला वा-यावर सोडून संकटाचा सोहळा साजरा करण्याचा रोग केंद्रासह पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जडला आहे,’ अशा संतप्त शब्दांत पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर माजी आमदार लांडे टीका केली आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आटोकाट प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने दर शुक्रवारी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. पार्थ दादा पवार युवा मंचच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधुन बाधित नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सत्ताधाऱ्यांना केवळ भ्रष्ट्राचार करण्यात रस असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. तसेच माझ्या जनसंपर्क कार्यालयातून व पार्थ दादा पवार युवा मंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांना विविध मदत उपलब्ध करून देऊ, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे.