Maval Loksabha : भीमसागरात उसळला महाआघाडीच्या प्रचाराचा जागर
उमेदवार पार्थ पवार यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
पदयात्रा आणि दुचाकी रॅलीने दिली मानवंदना
देहूरोड (महा-ई-न्यूज) – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आजजयंती असल्याने सर्वत्र भीमसागराचा उसळता माहोल असताना देहूरोड येथे भीमसैनिकांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे जंगी स्वागत करून भव्य दुचाकी रॅली काढली. पार्थ पवार यांनी प्रथम डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मनपूर्वक अभिवादन केले. दिक्षाभूमीपासून ते देहूरोड, कुंभारचौक, भाजीमंडई, पारसी चाळीत पार्थ यांनी पदयात्रा काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मावळातील प्रचारात ज़ोरदार मुसंडी मारली आहे. शेकडो कार्यकर्ते, तरुण आणि महिलांचा सहभाग वाढल्याने सर्वत्र राष्ट्रवादीमय वातावरण झाले आहे. नगरसेवक गोपाळ तंतरपाळे, कॉंग्रेस उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, गफूर शेख़, विल्सन पालीवाल, संभाजी पिंजन, सुखदेव निकाळजे, गोपाळ राव, मोहन राऊत, बाळू पिंजन, आरपीआय शहराध्यक्ष परशुराम दोडमणी, खय्युमशेख, अरुण जगताप, महबूब अंकलगी’ राष्ट्रवादीचे युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदींसह चार हजार तरुणांचा रॅलीत सहभागी होते.
दिक्षाभूमी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. तेथून पुढे सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. भाजीमंडईच्या समोरील गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेऊन पार्थ पवार यांनी मंडईत प्रवेश केला. तेथील ७५ वर्षाच्या तुळसाबाई श्रीपती भोसले या भाजी विक्रेत्या अजींसोबत पवार यांनी चर्चा केली. गेल्या पाच वर्षात सरकारने हाल-हाल केल्यामुळे बाजार भाव ठप्प झाल्याची भावना अजिबाईंनी मांडली. पुढील मांसाहार बाजारातील व्यवसायिकांनी या सरकारकडून होणारा अन्याय त्यांच्यासमोर मांडला. आम्ही करत असलेला व्यवसाय देखील हे सरकार समाधानाने करू देत नसल्याच्या वेदना त्यांनी पार्थ पवार यांना बोलून दाखविल्या.
घोषणांनी देहूरोड परिसर दुमदुमून गेला
भाजी मंडईतील भेटीनंतर पार्थ पवार यांनी कुंभार चौकातून पारसी चाळीत प्रवेश केला. गल्ली मोहल्ल्यात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा पहिला नेता म्हणून पार्थ पवार यांचे चाळीतील महिलांनी औक्षण केले. आजपर्यंत विद्यमान खासदार किंवा कोणत्या पक्षाचा नेता या मोहोल्ल्यात फिरकला नाही. तुम्ही स्वतः येऊन आमची विचारपूस केली, आम्हाला खूप समाधान वाटले, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. यावेळी ‘चौकीदार चोर है.., “कोण म्हणतंय ९० टक्के, शंभर टक्के शंभर टक्के”, “हमारा खासदार कैसा हो… पार्थ पवार जैसा हो…” अशा घोषणांनी देहूरोड परिसर दुमदुमून गेला. देहूरोडच्या मुख्य चौकातील रिक्षाचालकांशी संवाद साधून पार्थ पवार यांनी आपला मोर्चा विकासनगरकडे वळविला. शितळादेवीचे दर्शन घेऊन मामुर्डीत पुन्हा जोमाने रॅलीचा ताफा रवाना झाला. त्यानंतर ताफा चिंचोलीत दाखल झाला.