मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडतर्फे भक्ती-शक्ती शिल्प याठिकाणी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/maratha-photo_1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
भक्ती-शक्ती शिल्प, निगडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे हस्ते छ. शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचे शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे शहर सचिव सचिन दाभाडे, मराठा क्रांती मोर्चाचे जीवन बोराडे, सागर तापकीर, दीपक खैरनार, सुधीर वाकळे, संजय जाधव इत्यादि मान्यवरांसह मराठा क्रांती मोर्चा व विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी छ. शिवरायांना अभिवादन करताना मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रकाश जाधव म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध भागात आदिलशहा, निजामशहा, मुगल यांच्या सत्ता होत्या. शहाजी राजे व राजमाता जिजाऊ यांनी रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते शिवाजी राजेंनी पूर्ण केले. यास जनमान्यता मिळावी म्हणून राज्याभिषेक करणे गरजेचे होते. यासाठी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी राजधानी रायगड किल्ले येथे राज्याभिषेक करून घेतला. छ. शिवाजी महाराजांचे राज्य हे सर्वांना समान न्याय देणारे व जातीभेद, धर्मभेद न मानणारे होते.
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शहाजी राजेंचे निधन झाले तेव्हा आई जिजाऊ सती जायला निघाल्या होत्या. छ. शिवाजी महाराजांनी त्यापासून राजमाता जिजाऊंना रोखले, सती प्रथा बंद करणारे ते पहिले राजे होते. बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना आपल्या सैन्यात भरती करून घेऊन हातात शस्त्र देऊन मावळ्यांना सन्मान प्राप्त करून दिला. हे त्यांचे जाती निर्मूलनाचे कार्य आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सतिश काळे, धनाजी येळकर पाटील, जीवन बोराडे, सचिन दाभाडे, सागर तापकीर यांनी केले. सूत्र संचालन सतिश काळे यांनी तर आभार जीवन बोराडे यांनी मानले.