‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही’; काशिनाथ नखाते

पिंपरी : नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरी राजकोट परिसरामध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असे कामगार नेते काशिनाथ खाते म्हणाले.
कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे थरमॅक्स चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. राजकोट येथील निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. यावेळी राजू बिराजदार, तुषार घाटुळे, सुरेश देडे, व्यांकाप्पा जाधव, राहुल जामदार, सचिन नागणे, लाला राठोड, जीवन कदम, सलीम डांगे, यासीन शेख आदी उपस्थित होते.
हेही वाचा – आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुन्हा झापलं
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 43 फूट उंचीचा होता, मात्र तो कोसळला. महाराष्ट्रातील अथवा देशातील कोणताही पुतळा कोसळणे हे वेदना जनक असून ते गंजून झाले अथवा निकृष्ट दर्जामुळे झाले याला सर्वस्वी सरकार व व्यवस्था जबाबदार आहे. यावर मुख्यमंत्री म्हणतात की प्रति तास 45 किलोमीटर वेगाने हवा होती. त्यामुळे पुतळा कोसळला, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे की अशा किती हवा आल्या आणि किती वारे आले तरी महाराष्ट्रातील एकही पुतळा अशा पध्दतीने कोसळलेला नाही. शिवछत्रपतींचा पुतळा केवळ घाई गडबडीत आणि लवकर उद्घाटन करायचे म्हणून कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले गेले. त्यामुळे पुतळा कोसळला आहे. हा समस्त शिवप्रेमींचा अवमान असून हा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. हा पुतळा तातडीने उभा करण्यात यावा. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नखाते यांनी केली.





