Maha-E-News Effect : भोसरी- गंगोत्री पार्क दिघी रोडचे ‘विघ्न’ अखेर दूर!
स्थानिक नागरिक व महापालिका अधिकारी यांची बैठक : रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत दिले आश्वासन

पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातील भोसरी-दिघी रोडवर गंगोत्री पार्क येथील रस्त्याचा प्रश्न आणि दुरावस्था याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपायोजना हाती घेतल्या आहेत. सदर रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत तात्पूरता रस्ता डागडूजी करुन नागरिकांना खुला करण्यात येणार आहे, असे आश्वासन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिले आहे.
गंगोत्री पार्क येथील रस्त्याचा प्रश्न- दुरावस्था याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हीडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे यांच्या सोशल मीडिया टीमने हा मुद्दा उचलून धरला. त्याद्वारे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
गंगोत्री पार्क ज्या प्रभागात आहे. त्या प्रभागाचे नेतृत्व २० वर्षे गव्हाणे करीत आहेत. त्यामुळे ‘महाईन्यूज’ ने या मुद्यावर To The Point या वृत्तमालिकेत अजित गव्हाणे यांचा ‘सेल्फ गोल’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यामध्ये महानगरपालिकेतील शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी आणि भाजपाच्या सरचिटणीस कविता भोंगाळे यांच्या प्रतिक्रियेसह बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. अवघ्या काही तासांत संबंधितांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
भाजपा सरचिटणीस कविता भोंगाळे म्हणाल्या की, दिघी रोडवरील गंगोत्री पार्क येथील ड्रेनेज व खराब रस्त्यांमुळे नागरिकांना रोज ट्रॅफिकची समस्या भेडसावत होती. त्यातून नागरिकांची सुटका व्हावी याकरिता आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील व मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांची भेट घेतली. तसेच, नागरिकांच्या समस्या मांडत सविस्तर चर्चा केली. त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
भोसरीहून दिघीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगोत्री पार्क येथे ड्रेनेज लाइनसह संपूर्ण रस्त्याचे बांधकाम टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सध्या प्रवासी- वाहनचालकांना योग्य होईल, असा रस्ता तातडीने करण्यात येईल. तसेच, दि. ३ ऑक्टोबरपासून स्थापत्य, विद्युत आणि प्रभाग अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करावी आणि कामाचे नियोजन करावे. आगामी दीड-दोन महिन्यांत पक्का रस्ता करावा, अशा सूचना केल्या आहेत.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका.