Lockdown : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यावरच शाळा सुरू कराव्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/A-Gallery_46-5.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश नसले तरी नवीन शैक्षणिक वर्ष हे कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्यावरच शाळा सुरू कराव्यात. लॉकडाऊन उठवल्यानंतर लगेच शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे पुढील निर्णय परिस्थिती पाहून घ्यावा, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
कोरोनाचे संकट देशातून हद्दपार करण्यासाठी 22 मार्च रोजी जाहीर केलेला लॉकडाऊन तीनवेळा वाढविला. 17 मेनंतर राज्यातील लॉकडाऊन संपेल, यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूननंतर सुरू करण्याचे नियोजन चालू आहे. परंतु राज्यातील परिस्थिती पाहता कोरोनाच्या संख्येत वाढच होत आहे. यंदा कोरोनामुळे शालेय व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शाळा कधी पासून सुरू होतील आणि शिकवण्याची पद्धती कशी राहील, शाळा चालू केल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शाळा कशा चालवायची ? घर ते शाळा असा विद्यार्थ्यांचा प्रवास कसा असणार ? वर्गात अध्ययन व अध्यापन प्रक्रिया कशी पार पाडायची ? याची चिंता सर्वाना लागली आहे .
सध्यपरिस्थितीत माहिती तंत्रज्ञानानुसार लर्निंग फ्रॉम होम , अनेकविध अद्ययावत अध्ययन – अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे तंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा जवळजवळ सर्व शाळांत उपलब्ध आहे ज्या ठिकाणी सुविधा नसतील त्या ठिकाणी सुविधा द्याव्यात.अशा पद्धतीने शाळा व महाविद्यालयासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरण व नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
अनेक सरकारी, पालिका शाळा या कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. शिवाय खासगी शाळांमध्येही निर्जंतुकीकरणाची गरज आहेच. लॉकडाउन उठण्याऐवजी या विषाणूंवर औषध मिळेपर्यंत शाळा पूर्णपणे सुरू करू नयेत.लॉकडाउन उठल्यावर लगेचच शाळा सुरु केल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, म्हणून शाळा व महाविद्यालय सुरू न करता अद्ययावत तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक वर्ष चालू करावे, अशी मागणी केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.