लिव्ह इन पार्टनर बनला सैतान, प्रेयसीच्या दोन मुलांना बेदम मारत गाठला क्रुरतेचा कळस…
![Live-in partner became Satan, brutality reached the climax by killing the two children of his girlfriend...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/live-in-rlation.jpg)
नवी दिल्ली : ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये दोन प्रौढ म्हणजेच सुजाण व्यक्ती परस्पर संमतीनं एकत्र राहतात. त्यांचं नातं पती-पत्नींसारखं असतं, परंतु ते एकमेकांशी विवाहाच्या बंधनात बांधलेले नसतात. मात्र, आता एका महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं संबंधित महिलेल्या तीन मुलांवर धारदार शस्त्रानं वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोमवार, 2 जानेवारी 2023 रोजी ही घटना उत्तराखंड राज्यातील हिम्मतपूर भागात घडलीय. याप्रकरणी काशीपूरच्या आयटीआय पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी राजीव नावाच्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हिम्मतपूर येथे लिव्ह इनमध्ये महिलेसोबत राहणाऱ्या राजीव नावाच्या व्यक्तीनं महिलेच्या तीन मुलांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. मुलांची आई कामानिमित्त घराबाहेर गेली असताना आरोपीने हा हल्ला केला. या हल्ल्यात तिन्ही मुलं गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तसेच मुलांच्या आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय सिंह यांनी सांगितलं की, ‘पीडित मुलांच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला. यामध्ये तिन्ही मुलं जखमी झाली आहेत. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. घटनास्थळावरून आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी मुलांच्या आजोबांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.’
आईच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मुलांचा होता विरोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम (वय 10), अविनाश (वय 14) आणि पायल (वय 15) ही तीन मुले हिम्मतपूर गावात त्यांच्या आईसोबत राहतात. काही वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर या मुलांची आई राजीव नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पण राजीवसोबतच्या आईच्या नात्याला मुलांचा विरोध होता. त्यामुळे राजीव व मुलांचं रोज भांडण होत असे. सोमवारी राजीव व मुलांमध्ये वाद झाल्यानंतर राजीवनं मुलांना एका खोलीत बंद करून मारहाण केली, व त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात ओम आणि पायल या दोन मुलांची बोटे कापली गेली, व अविनाशसुद्धा गंभीर जखमी झाला.
मुलांनी आरडाओरड केल्यावर परिसरातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलं, व त्यांना उपचारानंतर पुन्हा घरी सोडलं. त्यानंतर पोलिसांनी मुलांच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरून राजीवच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानं संपूर्ण हिम्मतपूर परिसर हादरला आहे. पोलिस घटनेचा तपास करीत असून या तपासातून आणखी काही धक्कादायक खुलासे होणार का, याबाबतही परिसरात चर्चा सुरू आहे.