महापालिका मुख्यालयातील नागरिकांच्या प्रवेशावरील बंदी उठवली; कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार..!
![Lifted the ban on entry of citizens to the municipal headquarters; Only those who have taken two doses of Corona will get admission ..!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/images_1-1.jpg)
पिंपरी | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढता संसर्ग लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. आता या निर्णयात बदल करण्यात आला असून, मंगळवारपासून (१ फेब्रुवारी) कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना महापालिकेच्या मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार COVID-19 Omicron variant विषाणूचा प्रतिबंध करुन वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय व इतर कार्यालयांमध्ये नागरीक व अभ्यांगतांच्या प्रवेशांवर निर्बंध घातले होते.
आता या निर्णयात सुधारणा करून मंगळवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून महापालिका मुख्य कार्यालयात तसेच इतर कार्यालयात महापालिकेशी संबंधित कामकाजासाठी येणारे सर्व नागरिक व अभ्यागत यांना सुरक्षा विभागामार्फत प्रवेश दिला जाणार आहे.
महापालिका मुख्यालयात तसेच इतर सर्व कार्यालयात येणारे नागरिक व अभ्यागत यांनी लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण केल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा, असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.