‘‘नराधमाला आमच्या ताब्यात द्या’’; आमदार महेश लांडगेंची थेट पोलीस ठाण्यात धडक!
फुगेवाडी येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरण
![“Leave the massacre to us”; MLA Mahesh Landge hit the police station directly!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Mahesh-Landge-9-780x470.jpg)
पोलिसांकडून आरोपीला अटक; कठोर शिक्षा करण्याचे दिले आश्वासन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने अश्लील शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ‘‘आरोपीवर कठोर कारवाई करा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली.
दरम्यान, दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी संबंधित आरोपीला अटक केली असून, त्याला कठोर शिक्षा होईल, अशी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून, सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा पुणे) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केली असून, आरोपी गजाआड केला आहे.
आरोपी शेख हा शाळेतील अॅडमिन ऑफिसमध्ये काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने बॅड टच केल्याचे सांगितले. तसेच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबत देखील शेख याने असाच प्रकार केल्याचेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले आहे.
आरोपीवर कठोर कारवाई करावी. ज्यामुळे विकृत प्रवृत्तींना आळा बसेल. नाहीतर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. मुलींच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी. पीडित मुलींचे कुटुंबीय दबावामध्ये आहेत. शहरात अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी जबर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे, अशी मागणी आग्रही मागणी केली. याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाने कार्यवाही करु असे सांगितले आहे. पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य आहे. पण, कोणत्याही जाती-धर्माच्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.