विकलेल्या जमिनीचा पुन्हा ताबा घेऊन वकिलाने केली महिलेची आठ लाखांची फसवणूक, महिलेची पोलिसांकडे धाव
![Lawyer defrauds woman of Rs 8 lakh by repossession of land sold, woman runs to police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/fraud.jpg)
पिंपरी चिंचवड | कायदेशीर खरेदीखत करून विकत घेतलेल्या भूखंडाभोवती असलेले तारेचे कुंपण तोडून एका वकिलाने व त्याच्या कुटुंबीयांनी परस्पर जमिनीचा ताबा घेऊन सुमारे आठ लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याची लेखी तक्रार एका महिलेने पिंपरी-चिंचवडचे परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या महिलेने केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निशिगंधा शशांक अमोलिक (रा. गणेश कॉलनी, काळेवाडी) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांनी दिवंगत वकील सुनील शंकर राव वाल्हेकर तसेच वैशाली सुनील वाल्हेकर, शुभम सुनील वाल्हेकर, भरत शंकरराव वाल्हेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार अर्ज दिला. सदर संपूर्ण घटना 5 मे 2009 ते जानेवारी 2022 या दरम्यान घडली.
वाल्हेकरवाडी येथे राहणारे दिवंगत वकील सुनील वाल्हेकर यांनी वाल्हेकरवाडी येथील जमीन कायदेशीर खरेदीखत (क्र.83, हिस्सा क्र. 2+3+4/2,3) तसेच कुलमुखत्यारपत्र व ताबासाठेखत इत्यादी दस्त सह. दुय्यम निबंधक हवेली क्र.14, पिंपरी -चिंचवड यांच्या कार्यालयात निशिगंधा अमोलिक यांच्या नावे केले. सदर जमीन खरेदी व्यवहारापोटी सुनील वाल्हेकर यांनी निशिगंधा अमोलिक यांच्याकडून रोख स्वरूपात, टप्पाटप्प्याने एकूण रु.8 लाख 20 हजार इतकी रक्कम घेतली.
एकदा विकलेल्या जमिनीचा बेकायदेशीरपणे पुन्हा ताबा घेऊन फसवणूक केल्यामुळे अमोलिक यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची ताबडतोब भेट घेतली. त्यानंतर नाईक यांनी अमोलिक यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ – एक यांच्या कार्यालयात नेऊन या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार अर्ज दिला.
संबंधित परिवाराची परिसरात दहशत असून गेली कित्येक वर्षे या मंडळीचा बेकायदेशीर उद्योग चालू आहे. एकाच भूखंडाची अनेकांना विक्री करणे, कागदपत्रे न देणे, धमकावून जमीन पुन्हा ताब्यात घेणे, अशा प्रकारे त्यांनी शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रदीप नाईक यांनी केला. अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून रितसर तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.
या वाल्हेकर कुटुंबातील तक्रार अर्जातील उल्लेख केलेल्या लोकांवर त्वरित चौकशी होऊन गुन्हे दाखल न केल्यास आपण स्वतः आणि पीडित परिवारांचे सर्व सदस्य तीव्र आंदोलन करू, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.