थेरगावात लाडशाखीय वाणी समाजाचे उपवर परिचय संमेलन उत्साहात
तब्बल २७०० समजबांधवांची उपस्थिती: संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मनोज ब्राह्मणकार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे आयोजित उपवर परिचय संमेलन २०२६ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे आयोजित या संमेलनाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संमेलनात सुमारे २७०० समाजबांधव उपस्थित होते. त्यामध्ये ९८० उपवर व उपवधूंनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोज ब्राम्हणकार व राजेंद्रजी महालपुरे यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे, अनिताताई काटे तसेच नगरसेवक माऊलीशेठ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : बसमध्ये लहान मुलांचा वापर करून दागिने चोरी करणारी महिला टोळी अटकेत
मार्गदर्शनपर भाषणात मान्यवरांनी पारंपरिक विवाह जुळवणीसोबत आधुनिक विचारांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाढते घटस्फोटाचे प्रमाण आणि समाजाबाह्य विवाह या विषयांवरही त्यांनी भाष्य केले. यावेळी सुमारे ९५० परिचय पत्रकांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनात प्रत्येक वधू-वराला स्वतःची ओळख करून देण्याची संधी देण्यात आली. तसेच गुणोमिलनासाठी गुरुजींची व्यवस्था आणि परस्पर संवादासाठी स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने उपस्थितांना योग्य जोडीदार निवडणे सुलभ झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विवाह जुळवणी प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष नितीनजी देव, उपाध्यक्ष योगेश मोराणकर, नितीन वाणी, सोपान पितृभक्त, सनी शिरोडे, तैलेश बामणकर व किशोर ब्राह्मणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले, तर शेवटी भामरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजच्या बदलत्या काळात विवाह जुळवणी ही केवळ पारंपरिक पद्धतींवर मर्यादित न राहता आधुनिक विचारांची सांगड घालणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपवर परिचय संमेलनांमुळे समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते आणि कुटुंबांमध्ये संवाद वाढून सुदृढ नातेसंबंध निर्माण होण्यास मदत होते.
– मनोज ब्राह्मणकार, अध्यक्ष.





